कापणीच्या हंगामात परतीच्या पावसाचा धुमाकूळ

सुधागडातील भातशेतीला फटका, नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची सरकारकडे मागणी

| पाली/बेणसे । वार्ताहर ।

पाली सुधागड तालुक्यात परतीच्या पावसाने व वादळी वार्‍याने भात पिके अक्षरश आडवी झाली आहेत. सलग विजांचा कडकडाट व विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे ऐन कापणीच्या हंगामात हातातोंडाशी आलेला घास गळून पडण्याची भीती सुधागडातील शेतकरी वर्गाला पडली आहे.

भातशेती सह नाचणी, वरी, पालेभाजी या पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. भिजलेल्या व चिखलात रुतलेल्या भातपिकांचा दर्जा घसरला असून भातपिकाला भाव देखील कवडीमोल मिळेल अशी चिंता शेतकर्‍यांना सतावत आहे. इथली शेती पाण्याखाली बुडाली आहे. काही ठिकाणची पिके पूर्णतः झोपली आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास गळून पडल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.

शेतकर्‍यांची पिक जमिनीखाली गाडली गेलेली आहेत.आजघडीला भातशेती व अन्य पीक शेतीचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून सरकारने पुढाकार घेऊन नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना जलद नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पाली सुधागडसह अन्य विभागातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी केली आहे. नैसर्गिक व आस्मानी संकटाने शेतकरी शेतीपासून दूर चालला आहे. अतिवृष्टी, महापूर, ओला, कोरडा दुष्काळ, परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. भातशेती करणारा शेतकरी भातशेती का सोडत आहे याचा अभ्यास करण्यासाठी समिती संघटीत कराव. समितीमध्ये प्रगतशिल, अभ्यासु शेतकर्‍यांचा तज्ञांचा समावेश करुन शेतकर्‍यांच्या शेतीचा, शेतकर्‍यांचा राहणीमानाचा, व त्याला कशा प्रकारच्या मदतीची आवश्यकता आहे याचा अभ्यास होऊन समितीच्या शिफारशीनुसार भातपिक शेतकर्‍यांना सोई सुविधा व भात पिकाचा योग्य मोबदला देण्यात यावा. अशी मागणी सुधागड शेतकरी संघटनेचे सचिव शरद गोळे यांनी केली आहे.एकेकाळी भाताचे कोठार अशी ओळख असलेल्या जिल्ह्याची ही ओळख आता पुसते की काय अशी चिंता सतावू लागली आहे.

उदर निर्वाहाचे साधन शेती आहे, मात्र निसर्गा च्या लहरी पणामुळे शेती व्यवसाय धोक्यात आलाय, भातशेती पाण्याखाली गेली, पिक वाहून गेली, शेतकर्‍यांवर आस्मानी संकट ओढवले, तसेच शेतीसाठी झालेला मजुरी व इतर खर्च देखील मिळालेल्या उत्पादनात मिळत नाही, चिखलात रुतलेला भात काढणे मुश्किल झाले आहे. मायबाप सरकारने मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

माधुरी भोईर
शेतकरी

पावसामुळे पाताळगंगा परिसरातील भातशेती पाण्यात

। पाताळगंगा। वार्ताहर ।

परतीच्या पावसामुळे पाताळगंगा परिसरातील भातशेती पाण्यात गेली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये चितेंचे वातावरण पसरले आहे.

शेतकर्‍यांनी चांगले बी-विबयाणे पेरुन उत्तम भातपिकासाठी मेहनत घेतली होती. काही शेतकर्‍यांनी दुबार पेरणी करुन भातशेती लागवड केली. त्यानंतर पडणार्‍या पावसामुळे भातशेतीही उत्तम बहरु लागली. मात्र, सतत पडणार्‍या पावसामुळे भातशेतीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला. आणि, शेतकर्‍यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले. वाढत्या रोगामुळे पिकलेल्या भाताचे नुकसान होऊ लागले असून, तयार झालेली भातशेती पावसाच्या भीतीने कापताही येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

अशातच दोन दिवस जोरदार पाऊस आणि वादळ सुटल्यास शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेली भातशेती नष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरवर्षी शेतकर्‍यांना भातशेतीच्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. सध्या भातपिके चांगली असली तरी अनेक ठिकाणी पावसामुळे भातशेती आडवी झाली आहे.

शिहू विभागात परतीच्या पावसाचा भातशेतीला फटका

। शिहू । वार्ताहर ।

जिल्ह्यातील बहुतांश भागात सद्या परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून दुपारपर्यंत हवेत उष्णता व दुपार नंतर विजांच्या कडकडासह व ढगांच्या गडगडासह येणार पाऊस पडत आहे. या पावसामुळे शिहू विभागातील चोळे, गांधे बेणसे, जांभूळटेप, मुंढाणी, तरशेत, कुहिरे येथिल शेतकर्‍यांना फटका बसला असून तयार झालेले भात पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

या पावसामुळे निर्माण झालेल्या गारव्याने उष्णतेमुळे हैराण झालेल्यांना उकाडा कमी होऊन दिलासा मिळाला आहे. वातावरणात थंडावा निर्माण होत आहे. पावसाने अचानकपणे हजेरी लावल्याने मागील दोन दिवसांपासून संपुर्ण शिहू विभागातील शेतकर्‍यांना हवालदिन झाले आहते. हातातोंडाशी आलेले शेतातील भातपिक कोसळून अतोनात नुकसान होत आहे.त्यामुळे येथील शेतकरी पिकनुकसानीच्या संकटात सापडला आहे. त्यातच हा परतीचा पाऊस अजून किती दिवस कोसळणार याचाही अंदाज येत नसल्याने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले असून, शेतकरी हवालदिल झाला आहे.

Exit mobile version