विशेष मोहिमेतून करून ठेवी पुन्हा देण्यासाठी बँकाचा प्रयत्न
| रायगड | प्रमोद जाधव |
दहा वर्षांपासून बँकेशी कोणताही आर्थिक व्यवहार केला नाही. त्यामुळे या ठेवी रिझर्व्ह बँकेन जमा केल्या होत्या. परंतु, आता बँकेतील ही रक्कम परत मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत रायगड जिल्हा अग्रणी बँक, बँक ऑफ इंडिया यांच्या पुढाकाराने आणि सर्व सदस्य बँकांच्या सहकार्याने बँकानी विशेष जनजागृती मोहीम हाती घेतली असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विजयकुमार कुलकर्णी यांनी दिली. रायगड जिल्ह्यातील चार लाख 75 हजार 127 खातेदारांना दावा न केलेल्या 157 कोटी रुपयांच्या ठेवी परत मिळणार आहेत.
पूर्वी खात्यामध्ये किती रक्कम आहे, याची माहिती घेण्यासाठी बॅँकेत जावे लागत होते. काही वेळा बँकेत फोन करून माहिती विचारावे लागत होते. रायगड जिल्ह्यात बँकाचे जाळे प्रचंड वाढले आहे. शहरी भागापासून ग्रामीण भागात वेगवेगळ्या संस्था, बँकांच्या शाखा कार्यान्वित झाल्या आहेत. त्यामुळे खेड्यापाड्यात राहणाऱ्या नागरिकांना बँकेत खाते उघडण्यासाठी तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत नाही. बँकेचा कारभार ऑनलाईन झाल्याने घरबसल्या आर्थिक व्यवहार करण्याची व्यवस्थादेखील बँकांमार्फत करण्यात आली आहे. आपल्या खात्यामध्ये किती रक्कम शिल्लक आहे, किती रक्कम काढली, अशी सर्वच प्रकारची माहिती वेगवेगळ्या ॲप्सद्वारे मिळत आहे. ग्राहकांना जास्तीत जास्त चांगली सुविधा कधी मिळेल, याकडे संस्थांसह बँका बघत आहेत. त्यामुळे बँक आणि ग्राहकांचे नाते अगदी घनिष्ट होऊ लागले आहे. परंतु, अनेक वर्षांपूर्वी काही ग्राहकांनी बँक खाते उघडले. मात्र, नंतर बँकेशी व्यवहारच ठेवला नाही, असे चित्र काही प्रमाणात आहे. बँकेच्या व्यवहारापासून अनेकजण दूरच राहिले. त्यामुळे काही ग्राहकांची रक्कम खात्यातच पडून राहिली. बँकेत ठेवलेले पैसे घेण्यासाठी खातेदार बँकेत दहा वर्षे फिरकलेच नाही. त्यामुळे ती रक्कम रिझर्व्हे बँकेने जमा केली आहे. मृत खातेदारांचे वारस किंवा जिवंत असलेल्या खातेदारांनी बँकेशी संपर्क साधावा. कागदपत्रे सादर करून आपली रक्कम काढून घ्यावी. रिझर्व्हे बँकेेने दिलेल्या तीन महिन्यांच्या मुदतीमध्ये बँकेला कागदपत्रे सादर करावी. बँकामध्ये बचत, चालू खाते व ठेवी स्वरुपात असलेल्या दहा वर्षापेक्षा जास्त काळ दावा न केलेल्या ठेवी तथा पैसे काढण्यासाठी जे खातेदार बँकेत फिरकलेच नाहीत. अशा स्वरुपातील रकमा परत मिळविण्यासाठी जनजागृती व दावा मोहीम हाती घेण्यात आल आहे.
खातेदारांना त्यांच्या खात्यावरील रक्कम काढता येणार असून, पुढे नूतनीकरण करून खाते चालू ठेवता येणार आहे. या मोहिमेद्वारे सर्व बँकांकडून जनजागृती शिबिरे व ग्राहक भेटी तसेच तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समितीमध्ये 13 ऑक्टोबरपासून शिबीर आयोजित केले आहेत. खातेदारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अग्रणी व्यवस्थापक विजयकुमार कुलकर्णी यांनी केले आहे.
देशात एक लाख 25 हजार कोटींच्या ठेवी
देशभरात सुमारे एक लाख 35 हजार कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी विविध बँकांमध्ये शिल्लक आहेत. त्यापैकी महाराष्ट्र राज्यात 5866 कोटी रुपये, ज्यात वैयक्तिक खात्यांच्या 4612 कोटी, संस्थांच्या 1082 कोटी, आणि सरकारी योजनांतील 172 कोटी रुपयांच्या ठेवी समाविष्ट असल्याची माहिती समोर येत आहे.
आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार, 10 वर्षांपासून निष्क्रिय असलेल्या खात्यांतील ठेवी ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधी मध्ये हस्तांतरित केल्या जातात. तथापि, खातेदारांना आपले पैसे परत मिळवण्याचा पूर्ण हक्क आहे. ठेवी परत मिळविण्यासाठी संबंधित खातेदारांनी आपल्या बँकेत संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे व अद्ययावत सादर करणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील प्रमुख बॅँकांवर दृष्टीक्षेप
| बँकेचे नाव | ग्राहक संख्या | रक्कम (कोटीमध्ये) |
| बँक ऑफ इंडिया | 1,74,883 | 45.26 |
| बँक ऑफ महाराष्ट्र | 2504 | 8.68 |
| कॅनरा बँक | 26,939 | 6.74 |
| स्टेट बँक ऑफ इंडिया | 79,311 | 35 |
| युनियन बँक ऑफ इंडिया | 35,142 | 1179 |
| आयसीआयसीआय बँक | 6,318 | 2.27 |
| एम.एस.को. ऑप बँक्स | 1,02,183 | 30.58 |







