माकडाला प्राणिमित्रांनी केले जेरबंद

। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ येथील स्टेशन परिसरात असलेल्या निवासी संकुलात पिसाळलेल्या दोन माकडांनी गेली काही महिने धुमाकूळ घातला होता. नेरळ वन विभाग यांच्या माध्यमातून बदलापूर येथील प्राणीमित्र यांना पिसाळलेली माकडे पकडण्यासाठी पाचारण करण्यात आले. पाणीमित्रांनी त्यापैकी एका माकडाला पकडले असून दुसरे माकडे इमारतीवर पळत असल्याने त्याला पकडता आलेले नाही, तर पकडलेले माकड याला खोपोली येथे जंगलात सोडण्यात आले आहे.


नेरळ येथील खांडा मैदान भागात असलेल्या तुलसी संकुलात गेली काही महिने फासे पारधी यांनी सोडलेली दोन माकडांनी धुमाकूळ घातला होता. पिसाळलेली ती माकडे प्रत्येक घरात जाऊन शिजवलेले अन्न तसेच खाद्य पदार्थ यांच्यावर डल्ला मारायचे. तर काही माकडे लहान मुलांच्या हातातून वस्तू खेचून नेण्याचे देखील काम करायचे.त्यामुळे स्थानिक रहिवाशी यांनी या संकुलापासून 50 मीटर अंतरावर असलेल्या वन विभागाच्या कार्यालयात लेखी तक्रारी केल्या होत्या. मात्र अनेक महिने हा त्रास सहन करता येत नसल्याने 50हुन अधिक स्थानिकांनी वन विभागाच्या कार्यालयात जाऊन आपली समस्या मांडली होती. त्यानंतर वनक्षेत्रपाल उमेश जंगम यांनी बदलापूर येथील प्राणीमित्र यांना नेरळ येथे पाचारण केले. त्यावेळी बदलापूर रेस्क्यू टीमचे सदस्य मनोहर मेहेर, परेश पानसरे व मनीष फुलपगारे यांनी नेरळ येथे येथून रेकी केली होती. त्यानंतर त्या पिसाळलेल्या माकडांना पकडण्यासाठी बदलापूर रेस्क्यू टीमकडून लावलेल्या सापळ्यात एक माकड जेरबंद झाले. त्यावेळी बदलापूर रेस्क्यू टीमला नेरळ वनविभागाचे अधिकारी वनक्षेत्रपाल उमेश जंगम, वनपाल सुहास म्हात्रे हे मदत करीत होते. जर वनरक्षक भूषण साळुंखे, मनोज बारगजे तसेच वनमजुर ज्ञानेश्‍वर माळी हे प्रत्यक्ष प्राणीमित्र यांच्याबरोबर काम करीत होते.

Exit mobile version