ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान तीन चक्रीवादळांचे संकेत
| पुणे | प्रतिनिधी |
मान्सूनच्या परतीची चाहूल लागली असली, तरी पावसाचा धोका अद्याप टळलेला नाही. एकीकडे शेतकऱ्यांच्या शेतात खरीप पिके काढणीच्या उंबरठ्यावर असताना, दुसरीकडे परतीचा पाऊस आणि त्यानंतर अवकाळी पावसाची शक्यता कायम असल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. 19 सप्टेंबरपासून राजस्थानातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता असून, सप्टेंबरअखेर किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला तो महाराष्ट्रातूनही माघारी फिरू शकतो. मात्र, याच काळानंतर बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात हवामानातील हालचाली वाढण्याची शक्यता असल्याने पुढील तीन महिने पावसाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहेत.
भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) स्पेस ॲप्लिकेशन सेंटरच्या माध्यमातून केलेल्या हंगामी मॉडेलच्या अंदाजानुसार, ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान उत्तर हिंद महासागरावर तीन उष्णकटिबंधीय चक्रीवादळे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला तरी पावसाचे सत्र पूर्णपणे थांबणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.
इस्रोच्या स्पेस ॲप्लिकेशन सेंटरकडून देण्यात आलेल्या या अंदाजासाठी ‘क्युम्युलेटिव्ह पॉवर डिसिपेशन इंडेक्स’ या गणितीय मॉडेलचा वापर करण्यात आला आहे. शास्त्रज्ञांनी चक्रीवादळांच्या निर्मितीशी संबंधित 44 वर्षांची सरासरी तपासून हा हंगामी अंदाज तयार केला आहे. समुद्राच्या पृष्ठभागाचे वाढलेले तापमान, वातावरणातील आर्द्रता आणि मोसमी वाऱ्यांची स्थिती चक्रीवादळांच्या निर्मितीस पोषक ठरू शकते. बंगालचा उपसागर हा अरबी समुद्राच्या तुलनेत अधिक चक्रीवादळनिर्मितीस पोषक असल्याने या भागातील हवामानावर विशेष लक्ष राहणार आहे.
राजस्थानातून मान्सूनच्या परतीसाठी अनुकूल वातावरण तयार होत असून, 19 सप्टेंबरपासून राजस्थानातून मान्सून माघारी फिरण्याची शक्यता आहे. त्यानंतर सप्टेंबरअखेर किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला महाराष्ट्रातूनही मान्सून परतीचा प्रवास सुरू करू शकतो.
मात्र, मान्सूनच्या माघारीनंतर ऑक्टोबर ते डिसेंबर हा संक्रमणाचा काळ असल्याने बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात कमी दाबाच्या प्रणाली विकसित होण्याची शक्यता राहते. त्यामुळे मान्सून संपला तरी पावसाचे संकट संपणार नसून, परतीच्या पावसानंतर अवकाळी पावसाचे नवे सत्र सुरू होण्याची शक्यता आहे.
