येत्या 48 तासांत मान्सून अंदमानात; भारतीय हवामान विभागाचा अंदाज
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
उन्हाच्या तीव्र झळांनी होरपळणाऱ्या नागरिकांसासह पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी भारतीय हवामान विभागाने दिली आहे. दक्षिण बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या पोषक हवामानामुळे येत्या 16 मेपर्यंत मान्सून अंदमान-निकोबार बेटांवर दाखल होण्याची दाट शक्यता आहे. मोसमी वाऱ्यांच्या या वेगवान हालचालींमुळे यंदा पाऊस वेळेपूर्वीच भारतात धडकण्याचे संकेत मिळत आहेत. मान्सूनच्या प्रवासासाठी सध्या वातावरणात अत्यंत पोषक स्थिती तयार झाली असून, येत्या दोन दिवसांत मान्सून अंदमान आणि निकोबार बेटांच्या समूहामध्ये अधिकृतपणे प्रवेश करेल, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळ आणि त्यानंतर महाराष्ट्रात मान्सूनचे दमदार आगमन होईल, असे सांगण्यात आले आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 16 मेच्या सुमारास दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान-निकोबार बेटांवर मान्सूनचे आगमन होऊ शकते. मान्सूनच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेले समुद्रावरील वाऱ्यांची दिशा, आर्द्रता आणि वातावरणीय दाबाचे घटक सध्या अनुकूल आहेत. बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र अधिक सक्रिय झाल्यामुळे मान्सूनची पावले वेगाने भारताच्या दिशेने पडू लागली आहेत. मान्सूनचा हा प्रवास असाच अखंड सुरू राहिल्यास केरळ आणि महाराष्ट्रातही पाऊस वेळेपूर्वी येण्याची आशा पल्लवित झाली आहे.
केरळनंतर महाराष्ट्राचा नंबर?
अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर साधारणपणे तो केरळच्या दिशेने प्रवास करतो. अंदमानात मान्सून वेळेआधी पोहोचत असल्यामुळे केरळ आणि त्यानंतर महाराष्ट्रातही मान्सूनचे आगमन लवकर होणार का, याकडे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात महाराष्ट्रात पावसाची एन्ट्री होऊ शकते, असे प्राथमिक संकेत मिळत आहेत.
पुढील वाटचालीस अधिक बळ मिळणार
नैऋत्य आणि पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता वेल मार्क लो प्रेशर एरियामध्ये रूपांतरित झाले आहे. या शक्तिशाली हवामान प्रणालीमुळे मोसमी वाऱ्यांच्या हालचालींना मोठी गती मिळाली आहे. 13 मे रोजी हवामान विभागाने जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, या बदलांमुळे देशाच्या विविध भागांतील हवामानावर परिणाम दिसून येईल, ज्यामुळे मान्सूनच्या पुढील वाटचालीस अधिक बळ मिळणार आहे.
ईशान्य आणि दक्षिण भारतात मुसळधार
मान्सून अंदमानात दाखल होण्याच्या प्रक्रियेदरम्यान देशाच्या काही भागांत पावसाने जोर धरला आहे. 13 ते 19 मे दरम्यान ईशान्य भारतात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, दक्षिण भारतात देखील पावसाचा जोर वाढणार असून तामिळनाडू, केरळ, माहे, पुद्दुचेरी आणि दक्षिण कर्नाटकात 13 ते 17 मे या कालावधीत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे या भागांत मान्सूनपूर्व पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल.
उत्तर आणि पश्चिम भारतात उष्णता
एकीकडे मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागली असताना, दुसरीकडे उत्तर आणि पश्चिम भारताला उष्णतेच्या लाटेने वेढले आहे. बाडमेर येथे देशातील सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. येत्या आठवडाभर उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतातील अनेक भागांत उष्णतेची ही तीव्र स्थिती कायम राहणार आहे. महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांत उन्हाचा चटका जाणवत असून, अंदमानात मान्सून दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रातील पावसाच्या तारखांचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. अंदमानातील प्रवेशानंतर साधारणपणे 10 ते 15 दिवसांत मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर धडकतो, असा आजवरचा अनुभव आहे.
