संसदेचं पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून होण्याची शक्यता

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

संसदेचं पावसाळी अधिवेशन 19 जुलैपासून सुरु होऊ शकतं. हे अधिवेशन 13 ऑगस्टपर्यंत सुरु राहण्याची शक्यता आहे. कॅबिनेट समितीने 19 जुलै ते 13 ऑगस्टच्या दरम्यान मान्सून सत्र ठेवण्याची शिफारस केली आहे. यासंदर्भात खासदारांना हे अधिवेशन सुरु व्हायच्या आधी कोरोना लशीचे दोन्ही डोस घेण्याची सूचना देण्यात आली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास एका महिन्यापर्यंत चालणार्‍या या मॉन्सून सत्रादरम्यान 20 बैठका होण्याची शक्यता आहेत. सामान्यत: संसदेचं पावसाळी अधिवेशन जुलैच्या तिसर्‍या आठवड्यात सुरु होतं आणि स्वातंत्र्यदिनाच्या आधी समाप्त होतं. सूत्रांनी सांगितलंय की, संसदीय कार्यविषयक कॅबिनेट समितीने या अधिवेशनाच्या कार्यकाळासंदर्भात शिफारस केली आहे. त्यांनी म्हटलंय की, सत्राच्या दरम्यान संसद परिसरात कोरोनाशी निगडीत सर्व प्रकारच्या प्रोटोकॉलचं पालन केलं जाईल. या अधिवेशनाच्या दरम्यान संसद परिसरात प्रवेश करणार्‍यांनी कोरोना लसीचा कमीत कमी एक डोस घेतलेला असणे अनिवार्य असणार आहे.

Exit mobile version