माणगांव जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
स्वतःच्या मुलामुलींना लस्सी मधून फोरेट पाजून मुलाची हत्या आणि मुलीची हत्या करण्याच्या प्रयत्न करून स्वतः आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आईला दोषी ठरवत माणगांव जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि 10 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली. सदरील घटना दिघीसागरी पोलिस स्टेशनच्या हद्दीत दिनांक २० जुलै २०१५ रोजी दुपारी १.३० वाजता बोर्ली पंचतन चे एस. टी. स्टॅण्डचे बाजुला महालक्ष्मी स्विस्टमार्ट येथे घडली होती.
मनिषा प्रमोल बि-हाडी हीने आपला मुलगा संस्कार प्रमोल बिराडी वय ०८ वर्ष, मुलगी शुभ्रा वय दिड वर्षे यांस तीने स्वतः लस्सीमधुन फोरेट दिले. त्यात मुलगा संस्कार याचा मृत्यू झाला. तर मुलगी शुभ्रा हिचे रुग्णालयातील उपचारानंतर प्राण वाचले. तसेच तिने स्वतः देखील फोरेट पिवुन आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेची फिर्याद दिघीसागरी पोलीसांनी घेतली. भा.द.वि.स.कलम ३०२, ३०७,३०९ अन्वये गुन्हा दाखल केला. या गुन्हयाचा तपास दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एस. एन. मोगले यांनी केला. सदरचे दोषारोप पत्र जिल्हा व सत्र न्यायालय माणगांव येथे दाखल केले. सदर खटल्याची सुनावणी अति. सत्र न्यायाधीश पी.पी. बनकर माणगांव रायगड यांचे कोर्टात झाली. सदर गुन्हयात फिर्यादीची तसेच वैदयकीय अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली.
सदर खटल्यामध्ये सहा. सरकारी वकील ॲड. जितेंद्र म्हात्रे यांनी सरकार पक्षाच्या वतीने काम पाहिले. व कोर्टासमोर प्रभावीपणे युक्तीवाद करून . सर्वोच्य न्यायालय व उच्च न्यायालयांचे महत्वाचे न्यायनिर्णय दाखल केले. सदर केसच्या सुनावणी दरम्यान पैरवी अधिकारी उदय धुमास्कर, पोलीस उपनिरीक्षक, सौ. छाया कोपनर मपोह, शशिकांत कासार, पोह, शशिकांत गोविलकर पोह, सुनिल गोळे पोशि, यांनी सहकार्य केले. सदर साक्षीदारांची साक्ष व न्यायनिर्णयाच्या आधारे विशेष व सत्र न्यायाधीश श्रीमती पी.पी. बनकर माणगांव रायगड यांनी सदर घटनेतील गुन्हयाच्या शाबीतीनंतर महीला आरोपी यास दि.२० मे २०२२ रोजी दोषी ठरवुन भा.द.वि.स.कलम ३०२ अन्वये जन्मठेप १० हजार रूपये दंड, दंड न भरल्यास २ महीने साधी कैद, भा.द.वि.स.कलम ३०७ अन्वये १०, वर्षे सक्तमजुरी व ५०००/- हजार रूपये दंड, दंड न भरल्यास २ महीने साधी कैद, भा.द.वि.स. कलम ३०९ अन्वये ०१ वर्षे साधी कारावासाची शिक्षा सुनावली.