खेळण्यांची मोडतोड, बैठक व्यवस्थेची तोडफोड
| पनवेल | प्रतिनिधी |
तळोजा सेक्टर 10 येथील मैदानातील पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी गर्दुल्यांनी पालिकेच्या सुरक्षा रक्षकांसाठीची बैठक व्यवस्थेची तोडफोड केली होती. याबाबतच्या तक्रारीनंतर अखेर उद्यानाची दुरुस्ती पालिकेकडून सुरू झाली आहे. सिडकोने तळोजा सेक्टर 10 सेक्टरवरील 113-114 भूखंडावरील खेळाचे मैदान पनवेल पालिकेकडे हस्तातंरण झाले आहे. परिसरात एकमेव मैदान असल्यामुळे आणि मैदानात झोपाळासह खेळणी असल्यामुळे परिसरातील मुलांचा येथे वावर असतो, मात्र पनवेल पालिकेकडून दुर्लक्ष होत होते. त्यामुळे खेळण्यांची मोडतोड झाली असून, मुलांचा हिरमोड होत आहे. या उद्यानाच्या देखभालीसाठी पालिकेकडून सुरक्षा रक्षकांसाठीची बैठक व्यवस्था उभारण्यात आली होती, मात्र गर्दुल्ल्यांनी रात्रीच्या वेळी तोडफोड केली होती. मैदानातील पथदिवे बंद असल्यामुळे रात्रीच्या काही गर्दुल्ले अंधाराचा फायदा घेत अमली पदार्थाची सेवन करीत असतात. या संदर्भात पालिकेचे उद्यान अधिकारी उपायुक्त नानासाहेब कामठे यांच्याकडे विचारणा केली असता मैदानाची पाहणी करून उपाययोजना केली जाईल, अशी सूचना केली आहे. पालिकेने मैदानातील मोडकळीस आलेल्या खेळणी दुरुस्ती करून सुरक्षा रक्षक करणे आवश्यक आहे. तसेच पोलिसांनी गस्त घालणे आवश्यक आहे.






