माझगाव डॉक शिप बिल्डर्सचे अपयश; जेएनपीएकडून कंत्राट रद्द करण्याच्या हालचाली
| चिरनेर | प्रतिनिधी |
मागील वर्षभरापासून आश्वासनांच्याच मुहूर्ताच्या हिंदोळ्यावर हेलकावे खाणारी जेएनपीएची बहुचर्चित ई-स्पीड बोट सेवा अद्यापही सुरूच झालेली नाही. त्यामुळे निराशेच्या गर्तेत सापडलेल्या आणि टिकेचे धनी ठरलेल्या जेएनपीएने माझगाव डॉक बिल्डर्स लिमिटेड कंपनीला बोटी पुरवठा व हाताळणीच्या कामाचे कंत्राट आणि 37 कोटी 89 लाख 94 हजार 190 रुपये खर्चाची तरतूदही रद्द करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत, अशी माहिती जेएनपीए अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
उरण-नेरुळ रेल्वेमुळे जेएनपीए-मुंबई सागरी मार्गावरील प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणावर घसरली आहे. त्यामुळे जेएनपीएला जेएनपीए-मुंबई या सागरी प्रवासी मार्गावरील लाकडी प्रवासी बोट सेवेचा खर्च परवडेनासा झाला. तसेच, प्रवासी वाहतूकसाठी वापरण्यात येणाऱ्या जुनाट लाकडी बोटीही खार्चिक व सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातूनही उपयुक्त नसल्याने जेएनपीएचे माजी अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी तासाचा प्रवास अगदी 35-40 मिनिटातच होणाऱ्या ई-स्पीड बोटीचा पर्याय निवडला होता. प्रदुषणविरहित इलेक्ट्रॉनिक बॅटरीवर चालणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञान व सोयी सुविधांनी सुसज्ज असलेल्या दोन ई-स्पीडबोटींचे कंत्राट माझगाव डॉक बिल्डर्स लिमिटेड कंपनीला बोटी पुरवठा व हाताळणीचे काम देण्यात आले होते. 10 वर्षं ई-स्पीडबोटींची सेवा पुरवण्यासाठी जेएनपीएने 37 कोटी 89 लाख 94 हजार 190 रुपये खर्चाची तरतूदही केली आहे. उन्हाळी हंगामात 20-25 प्रवासी व पावसाळी हंगामात 10-12 क्षमतेच्या दोन स्पीडबोट बोटी फेब्रुवारी 2025 पासुनच प्रवासी वाहतूकीसाठी जेएनपीटीच्या सेवेत दाखल होणार असल्याची घोषणा जेएनपीएने केली होती. मात्र, स्पीडबोटींचा वेग, प्रवासी वाहतूकीची क्षमता, तांत्रिक अडचणी आणि वारंवार करण्यात आलेल्या चाचण्यानंंतरही मागील वर्षभरापासून ई-स्पीडबोट सेवा सुरूच झालेली नाही. त्यामुळे प्रतिक्षेत असलेल्या प्रवाशांचा भ्रमनिरास झाल्याने प्रवासीवर्गातुन नाराजी व्यक्त करीत जेएनपीएवरच टीकेची झोड उठवली आहे. त्यानंतर वारंवार टिकेचे धनी ठरलेल्या संतप्त झालेल्या जेएनपीएनेही माझगाव डॉक बिल्डर्स लिमिटेड कंपनीला दोन ई-स्पीड बोटी पुरवठा व हाताळणीच्या कामाचे कंत्राट आणि 37 कोटी 89 लाख 94 हजार 190 रुपये खर्चाची तरतूदही रद्द करण्याच्या हालचाली सुरू केल्या असल्याची माहिती जेएनपीए अधिकाऱ्यांनी दिली.
