मुंबई-गोवा महामार्गाचे ‘हे’ सत्य तुम्हाला माहित आहे?

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. जानेवारी ते सप्टेंबर 2022 या 9 महिन्यांत रायगड जिल्हा पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीत येणार्‍या महामार्गावरील भागात 145 अपघात झाले असून, त्यामध्ये 49 जणांचा मृत्यू तर 160 जण जखमी झाले आहेत.

पळस्पे ते कशेडी या 154 किलोमीटर दरम्यान मुंबई-गोवा महामार्ग जातो. या महामार्गावर सध्या क्षमतेपेक्षा जास्त वाहतुक सुरु आहे. महामार्गावरुन दररोज 1 लाख 85 हजार 942 मेट्रिक टन एवढी वाहतुक होते. तसेच महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. यामधील पळस्पे ते इंदापूर या 84 किलोमिटर लांबीच्या पहिल्या टप्प्याच्या चौपाफरिकरण करण्याची मुदत संपूनही चौपदरीकरणाचे काम रखडले आहे.

महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून, ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत, या सर्व बाबींमुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याचे दिसून येते. तसेच वेगाने वाहन चालविल्यामुळेही मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. जानेवारी ते सप्टेंबर 2022 या दरम्यान महामार्गावर 145 अपघात झाले, त्यामध्ये 49 जणांचा मृत्यू झाला आहे.

मानवी साखळी आंदोलन
मुंबई-गोवा महामार्गावरील वडखळ ते इंदापूर या अंतरात महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्याकडे सरकारचे होणारे अक्षम्य दुर्लक्ष याविरोधात रायगड प्रेस क्लबच्या वतीने 9 नोव्हेंबर रोजी कोलाड येथे मानवी साखळी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात जिल्हाभरातील पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी होतील. रायगड प्रेस क्लबच्या कार्यकारिणीची बैठक पोलादपूर येथे संपन्न झाली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

अपघात दृष्टिक्षेप (जानेवारी ते सप्टेंबर)
एकूण अपघात : 145
मृत्यू : 49
गंभीर जखमी : 118
किरकोळ जखमी : 42

Exit mobile version