अपघाताची दाट शक्यता; प्रशासन निद्रावस्थेत
| कोलाड | वार्ताहर |
रोहा तालुक्यात शनिवारी दुपारी तसेच, मध्यरात्री पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड आंबेवाडी नाक्यावरील रस्त्यावर पाणी साचले होते. पहिल्याच पावसात रस्त्यावर पाणी तुंबल्याने अनेकांची तारांबळ उडाली. तर, पादचाऱ्यांना त्या चिखलमय पाण्यातूनच मार्ग काढावा लागला.
रोहा तालुक्यात पावसाची दमदार सुरूवात झाली असून मुंबई-गोवा महामार्गावर कोलाड आंबेवाडी नाक्यावरील रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम तसेच उड्डाण पुलाचे काम सुरू असल्याने काही ठिकाणी खोदाई करण्यात आलेली आहे. त्यातच जागोजागी पडलेल्या खड्ड्यांत पाणी तुंबल्याने वाहतुकीस अडथळा ठरत असून चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच, रस्ता चिखलमय झाल्यामुळे रिक्षा, दुचाकी तसेच पादचारी नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.
मुंबई-गोवा महामार्ग तसेच कोलाड आंबेवाडी नाका चौक हे बाजारपेठेचे मध्यस्थी ठिकाण असून येथून मुंबई-गोवा तसेच पुणे, रोहा, मुरुड, अलिबागकडे जाण्यासाठी प्रचंड मोठया प्रमाणात वाहतूक सुरु असते. परंतु, हा रस्ता पूर्णपणे खचला आहे. तर, काही ठिकाणी रस्त्याची डांबर निघून गेल्यामुळे रस्त्याचे खडेवर आल्यामुळे या रस्त्यावरुन दुचाकी गाड्या स्लिप होत आहेत. यामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याला निद्रअवस्थेत असलेला प्रशासन व प्रशासनाचा ठेकेदारावर नसलेला वचक हे कारणीभुत आहेत. यामुळे शासनाच्या तिजोरीतील करोडो रुपये वाया गेले तरी रस्त्याचे काम पुर्ण होत नाही. परंतु, खचलेल्या व निकृष्ट झालेल्या रस्त्यामुळे कोणाचा नाहक बळी गेला तर याला जबाबदार कोण, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवासी वर्गातून व्यक्त केली जात आहे.