मुंबई-गोवा महामार्ग अद्याप खड्ड्यातच

सरकारचे श्राध्द घालून आंदोलन करण्याचा इशारा

। धाटाव । प्रतिनिधी ।

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला आता तब्बल 17 वर्षे लोटली तरीही हा महामार्ग अजूनही पूर्ण झाला नाही. नागोठणे ते लोणेरेपर्यंत रस्त्याची दुरवस्था झाली असून खड्डयांचे साम्राज्य पसरले आहे. हा रस्ता 15 ऑगस्टपर्यंत सुस्थितीत केला नाही, तर मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली 17 ऑगस्ट रोजी खड्ड्यांच्या ठिकाणी सरकारचे श्राध्द घालून आंदोलन करणार असल्याचे निवेदन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणला देण्यात आले आहे.

देशातील काही रस्त्यांची कामे वेगाने पूर्ण करून गिनिज बुक सारख्या विक्रमांची नोंद करणार्‍या भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने जगातील सर्वाधिक काळ रखडलेला महामार्ग म्हणून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यासाठी देखील तेवढीच तत्परता दाखवावी, अशी मागणी रायगड प्रेस क्लबने या निवेदनातून केली आहे. यातच या महामार्गाचे 95 टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा महामार्ग प्राधिकरणाकडून केला जात आहे. तो दावा अर्धसत्य असून, रायगड जिल्हा हद्दीमध्ये अनेक भागात या महामार्गाचे काम रखडले आहे. महामार्गाचा जो भाग तयार झाला आहे, तो देखील नित्कृष्ट दर्जाचा आहे. तयार मार्ग समतल नसल्यामुळे उड्या मारतच या मार्गावरून वाहने धावत असतात. ठिकठिकाणी काँक्रीट रस्त्याला भेगा पडल्या आहेत. या कामात कोणत्याही प्रकारचा दर्जा आणि गुणवत्ता राखली गेलेली नाही हे याचे निदर्शक असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी रायगड प्रेस क्लबने या महामार्गावर आंदोलन करायचे आणि राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री, पालकमंत्री, खासदारांनी पाहणी दौर्‍यांचा फार्स करुन थातूरमातूर उपाययोजना करायच्या हा परिपाठ पडून गेला आहे. रायगड प्रेस क्लब त्याच प्रमाणे जिल्ह्यातील विविध संघटनांनी वारंवार आंदोलने करुन देखील या रस्त्याची दुर्गती काही संपण्यास तयार नाही. जर 15 ऑगस्ट पूर्वी हा महामार्ग सुस्थितीत झाला नाही, तर मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस. एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दि.17 ऑगस्ट रोजी आंदोलन छेडण्यात येईल. आणि याची सर्व जबाबदारी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिाकरण विभागावर आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांवर तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांवर राहिल, असा इशारा रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे, कार्याध्यक्ष प्रशांत गोपाळे, सचिव अनिल मोरे यांनी दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

या निवेदनाची प्रत केंद्रिय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, रायगडचे पालकमंत्री, खासदार, जिल्हाधिकारी किसन जावळे, पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनाही पाठविण्यात आले असल्याचे रायगड प्रेस लबचे जिल्हाध्यक्ष मनोज खांबे यांनी सांगितले.

Exit mobile version