| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेची काटेकोर व पारदर्शक अंमलबजावणी व्हावी, यासाठी पनवेल महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे तात्काळ निराकरण होणे तसेच निवडणूक प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राखण्यासाठी आचारसंहिता कक्ष व तक्रार निवारण कक्ष महापालिका मुख्यालयात सूरू करण्यात आला आहे. तसेच या कक्षाची माहिती महापालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पनवेल महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे यांची आचारसंहिता पथक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना सहायक म्हणून उपायुक्त रवीकिरण घोडके नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांनी आदर्श आचारसंहितेबाबत कोणतीही तक्रार, सूचना किंवा माहिती द्यावयाची असल्यास 022 2745 8040/8041/8042 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा panvelcorporationmcc@gmail.com या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा, असे आवाहन पनवेल महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रियेत शिस्त, नियमपालन व पारदर्शकता राखण्यासाठी पनवेल महानगरपालिका सतत दक्ष असून या कामी नागरिकांचा सहभाग व सहकार्य महत्त्वाचे असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महापालिकेकडून आचारसंहिता, तक्रार निवारण कक्ष सुरू
