फुटपाथ व्यावसायिकांना पालिकेने जागा द्यावी

| माथेरान | वार्ताहर |

माथेरानमध्ये फुटपाथ व्यावसायिकांना पालिकेने जागा द्यावी, अशी मागणी स्थानिकांनी प्रशासनाकडे केली आहे. माथेरानच्या प्रवेशद्वारा पासून ते महात्मा गांधी मार्गावरील बाजारपेठे पर्यंत बेरोजगारीमुळे सर्वत्र रस्त्याच्या आजूबाजूला हॉकर्स लोकांनी आपली लहानलहान दुकाने थाटली आहेत. काहींनी तर आपल्या स्टॉल समोर रस्त्यावर खुर्च्या टाकून पर्यटकांना खाद्यपदार्थ विक्री करत आहेत त्यामुळे अनेकदा घोडे, हातरीक्षा त्याचप्रमाणे पायी चालणार्‍या पर्यटकांना चालणे खूपच जिकीरीचे आणि त्रासदायक बनलेले आहे.

नगरपरिषदेच्या माध्यमातून या स्टॉल धारकांकडून नियमितपणे 30 रुपये आकारणी केली जाते. काहींनी तर फक्त टेबल लावून जागा अडवून ठेवलेल्या आहेत. तर काहींनी असे टेबल अन्य व्यक्तींना भाडेतत्त्वावर सुध्दा दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सुध्दा रहदारी वेळेस अडचणी निर्माण होत आहेत. दिवसेंदिवस वाढत्या महागाई मुळे स्थानिकांना आपल्या कुटुंबाची उपजीविका करणे कठीण बनलेले असल्याने महात्मा गांधी मार्गावर रस्त्याच्या बाजूला आपापले व्यवसाय करत आहेत त्यांनाही सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून योग्य जागा उपलब्ध करून दिल्यास मुख्य रस्त्यावर सुट्टयांच्या हंगामात वाहतुकी वेळी अडचणी निर्माण होणार नाहीत.

पिढ्यानपिढ्या वास्तव्यास असलेल्या भूमिपुत्रांना व्यवसाय करण्यासाठी पर्यायी व्यवस्था निर्माण करून देणे गरजेचे आहे.काही दिवसातच इथे पर्यावरण पूरक ई रिक्षा कायमस्वरूपी सर्वत्र मुक्तपणे धावणार आहे.त्यामुळेच सद्यस्थितीत परिसरातील लोकांनी विविध पॉईंट्स वर आपला कब्जा सुरू केल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. येथील टपाल पेटी नाक्यावर कुणा अज्ञात व्यक्तीने बाजूची जागा दुकानासाठी टेबल लावणेकामी ई-रिक्षा माहिती फलकाचे लोखंडी गज कापण्याचा प्रयत्न केलेला दिसुन येत आहे. याकडे संबंधीत सर्वच विभागानी लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

प्रत्येक माणूस उठसुठ रस्त्यावरती टपर्‍या, टेबल्स उभ्या करतोय. काही लोकांची स्वतःची दुकान पण आहेत तरीसुध्दा रस्त्यावर छोटीशी दुकान उभी केल्यामुळे याचा सुळसुळाट खूप वाढला आहे. आमच्या घोड्यांना, हातरिक्षांना येताना जाताना खूप त्रास होतो. काही घोडे दचकून पर्यटक पडतात सुद्धा. त्यावेळी आम्हाला दोषी ठरवले जाते, याकडे अधिकार्‍यांचे लक्ष नसते.

राकेश कोकळे, अश्‍वपाल माथेरान
Exit mobile version