चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात
| रेवदंडा | प्रतिनिधी |
रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीतील चौल गावातील टेकाळकर आळी येथे राहणाऱ्या 70 वर्षीय वृद्ध महिलेच्या खून आणि जबरी चोरीच्या प्रकरणाचा रायगड पोलिसांनी अवघ्या 48 तासांत उलगडा केला आहे. याप्रकरणी मयत महिलेचा जावई असलेल्या मुख्य आरोपीसह चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मंदा प्रमोद म्हात्रे (70) या चौल, ता. अलिबाग येथे एकट्याच राहात होत्या. 28 जानेवारी रोजी सकाळी साडेनऊपूर्वी अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या घरात घुसून त्यांचा खून केला आणि अंगावरील सोन्याचे दागिने जबरी चोरीने लंपास केले. या घटनेनंतर 29 जानेवारी रोजी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी माया मोरे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले. तांत्रिक विश्लेषण आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात यश आले.
याप्रकरणी महादेव ऊर्फ शिवा राधाकिसन ढोबळे (25, रा. जाटदेवळा, ता. पाथडी, जि. अहिल्यानगर) यास आष्टी (जि. बीड) येथून ताब्यात घेण्यात आले. अशोक अजिनाथ भोसले (19) आणि गणेश उत्तम पंडागळे (25) यांना जाटदेवळा येथून अटक करण्यात आली. तर शुभम एकनाथ पवार (23, रा. माणिक दवंडी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) यास पेण (जि. रायगड) येथून ताब्यात घेण्यात आले.
प्राथमिक तपासात मुख्य आरोपी महादेव ढोबळे हा मयत महिलेचा जावई असल्याचे समोर आले. वृद्ध महिला घरात एकट्या राहात असल्याची माहिती आरोपींना असल्याने त्यांनी घरात प्रवेश करून खून व चोरी केल्याचे उघड झाले आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास रेवदंडा पोलीस ठाण्याचे सपोनि भैरु जाधव करीत असून, खून करण्यामागील नेमके कारण आणि चोरीस गेलेले दागिने हस्तगत करण्याबाबत तपास सुरू आहे. अवघ्या 48 तासांत गंभीर गुन्ह्याचा उलगडा केल्याबद्दल रायगड पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
