रायगड पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात
। अलिबाग । प्रतिनिधी ।
चाकूने वार करून सहा वर्षांपूर्वी मृतावस्थेत नाल्यात टाकून दिलेल्या जयेश खुडेच्या खुनाचा गुन्हा अखेर उघडकीस आणण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रायगड व रसायनी पोलिसांनी खुन्याचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले आहे. हा खून पैसे न दिल्याच्या वादावरून झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, त्याच्यावर चाळीस खुनाचे वार झाल्याने ही माहिती न पटण्यासारखी असल्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे. त्यामुळे अधिक तपास करून नक्की खून करण्याचे कारण शोधण्याचे काम युद्धपातळीवर असल्याचे ते म्हणाले.
जयेश 10 एप्रिल 2018 ला घरातून कामानिमित्त बाहेर गेला होता. तो परत आलाच नाही. शोधाशोध करूनही त्याचा तपास न लागल्याने, अखेर कुटुंबियांनी 11 एप्रिलला रसायनी पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दाखल केली होती.रसायनी येथी मोहपाडा परिसरात चावणे ते पेट्रो नॉस कंपनीकडे जाणार्या एका नाल्यात 13 एप्रिल 2018 रोजी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास जयेशचा मृतदेह सापडला होता. त्याच्या छातीवर चाकूने वार केलेल्या जखमा आढळून आल्या होत्या. पोलिसांनी हत्या करणार्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. परंतु, काही तपास लागला नव्हता.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी उघडकीस न आलेल्या जुन्या खुनांची उकल करण्यासाठी पथक तयार केले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकासह रसायनी पोलीसदेखील कामाला लागले. रसायनी पोलीस ठाण्याच्या एका कर्मचार्याला खबर्यांमार्फत माहिती मिळाली. पोलिसांनी त्यानुसार दोघांना ताब्यात घेतले. त्यातील एकजण कल्याणमध्ये रिअल इस्टेटमध्ये काम करणारा, तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. पोलिसी दणका मिळाल्यावर दोघेही बोलके झाले. सहा वर्षांपूर्वी रात्री जयेश चालत जात होता. त्याला दुचाकीवर लिफ्ट दिली होती. मात्र, त्याने पैसे न दिल्याने त्याच्यावर चाकूने वार करून ठार केल्याची कबुली त्यांनी दिली.
दोघेही खालापूरमधील रहिवासी ओमकार शिंदे व रोहित पाटील अशी आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण, सहाय्यक फौजदार राजेश पाटील, प्रसाद पाटील, पोलीस हवालदार यशवंत झेमसे, संदीप पाटील, राकेश पाटील, सुधीर मोरे यांनी यांनी आपले कौशल्यपणाला लावून या दोघांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. अखेर या दोघांना ताब्यात घेण्यात आले. ओमकार हा खालापूरमधील वावंढळ व रोहित हा चांभार्ली येथील रहिवासी आहे. रोहितला अहमदनगर जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे.
… तो होता दुसर्या गुन्ह्यात महिनाभर कारागृहात जयेशच्या खुनानंतर आरोपी ओमकारविरोधात गंभीर दुखापत केल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे तो एक महिनाभर या गुन्ह्याबाबत कारागृहात होता. त्यामुळे पोलिसांना जयेशच्या खुन्याचा शोध घेता आला नाही. गेली सहा वर्षांपासून पोलीस त्याच्या शोधात होते. अखेर खबर्यांकडून माहिती मिळाल्यावर जयेशचा खून करणारा ओमकार पोलिसांना सापडला.







