| नागोठणे | प्रतिनिधी |
भांडणाचा राग मनात धरून अजय संतोष वाघमारे याची हत्या केल्याच्या प्रकरणात आरोपी राहुल उदय वाघमारे यास अलिबाग येथील प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश आर.डी. सावंत यांनी सोमवारी (दि.5) दोषी ठरवून आठ वर्षे सक्त मजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
हत्येची ही घटना अलिबाग तालुक्यातील बुरुमखाण आदिवासी वाडी, वरसोली या गावाच्या हद्दीत एप्रिल 2024 मध्ये घडली होती. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले तपासनिक अधिकारी व सध्या नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि सचिन कुलकर्णी यांची साक्ष महत्त्वाची ठरली.
22 एप्रिल, 2024 रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास बुरुमखाण आदिवासी वाडीच्या हद्दीत घडलेल्या या गुन्ह्यातील फिर्यादी अर्चना अजय वाघमारे यांचे सासरे संतोष बाळू वाघमारे व आरोपी राहुल वाघमारे यांच्यामध्ये शाब्दिक वाद होऊन भांडण झाले होते. भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी यांचे पती अजय संतोष वाघमारे हे गेले असता आरोपी राहुल वाघमारे याने वाघमारे यांचा गळा दोन्ही हाताने पकडून त्यांना जिवानिशी ठार मारले होते. त्यानंतर फिर्यादी अर्चना वाघमारे यांच्याकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर राहुल वाघमारे याच्यावर अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी प्रभारी अधिकारी, सपोनि सचिन कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जलद गतीने तपास पूर्ण करून मोलाचे सहकार्य केले होते. या प्रकरणात शासकीय अभियोक्ता संतोष पवार यांनी एकूण 12 साक्षीदार तपासून युक्तिवाद केला. यामध्ये फिर्यादी, साक्षीदार व तपासकीय अधिकारी असलेले सपोनि सचिन कुलकर्णी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. तसेच याप्रकरणी पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुनील डोंगरे, पैरवी कर्मचारी पो. ह. सचिन खैरनार, पो.ह. प्रवीण पाटील यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.







