| पनवेल | दीपक घरत |
पालिका हद्दीतील काही स्मशानभूमींमधून राख चोरीला जात असल्याच्या तसेच स्मशान परिसरात अघोरी प्रकार होत असल्याच्या बातम्या दैनिक कृषीवलमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर परिसरात चर्चांना उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर या प्रकरणात एक वेगळी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पालिका हद्दीतील काही स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कारानंतर मोठ्या प्रमाणात राख पडून राहात असल्याने त्या राखेची विल्हेवाट कशी लावायची, हा प्रश्न तेथील कर्मचाऱ्यांसमोर निर्माण होत आहे. याचा फायदा घेत एक महिला आपल्या काही कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन स्मशानातील ही राख उचलून नेत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, संबंधित महिला ही राख नेमकी कशासाठी वापरते किंवा ती कुठे नेली जाते, याबाबत स्मशानातील कर्मचाऱ्यांनाही कोणतीही ठोस माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. काही ठिकाणी अंत्यसंस्कारावेळी राहिलेल्या दागिन्यांचे सूक्ष्म अंश अथवा सोने मिळवण्यासाठी राख चाळली जात असल्याच्या चर्चाही होत असल्याने या प्रकाराबाबत नागरिकांमध्ये विविध तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहेत.
या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, स्मशानातील राखेची अधिकृत विल्हेवाट लावण्याबाबत पालिकेकडून कोणती व्यवस्था आहे का, तसेच ही राख नेण्यासाठी कोणाला अधिकृत परवानगी देण्यात आली आहे का, याबाबत स्पष्टता होणे आवश्यक असल्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी धुळे शहरातील देवपूर अमरधाम स्मशानभूमीतून राख चोरीला गेल्याची घटना समोर आली होती. चोरी केलेल्या राखेतून सोने मिळवण्यासाठी काही अज्ञात व्यक्तींनी हा प्रकार केल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे पनवेलमध्येही स्मशानातील राख उचलून नेली जात असल्याची माहिती समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये संशय अधिक वाढला असून, या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
पालिकेच्या भूमिकेकडे लक्ष
स्मशानातील राखेची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेकडून अधिकृत पद्धत काय आहे आणि या प्रकाराला कोणाची परवानगी आहे का, याबाबत पनवेल महानगरपालिकेने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अनेक प्रश्न अनुत्तरीत
स्मशानातील राख उचलून नेणारी महिला नेमकी कोण?
ती राख कुठे आणि कशासाठी नेली जाते?
यासाठी कोणाची अधिकृत परवानगी आहे का?
स्मशानातील राखेची विल्हेवाट लावण्याची पालिकेची पद्धत काय?
या प्रकाराची चौकशी होणार का?
स्मशानभूमी हा अत्यंत संवेदनशील विषय असून, तेथील राख अशा प्रकारे उचलून नेली जात असल्याची माहिती समोर येणे चिंताजनक आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी.
संजय वाजत्री,
स्थानिक नागरिक






