रायगडच्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये १८,६६५ प्रकरणे निकाली

९ कोटी ९१ लाख ६१ हजार १३ रूपयाची तडजोड रक्कम वसूल
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
न्यायालयात वर्षानुवर्षे वाद करीत बसून वेळ, पैसा आणि ताकद खर्च करण्यापेक्षा दोन्ही पक्षांनी सामंजस्याची भूमिका घेउन लोक न्यायालयात समेट घडवावा, असा प्रवाह भारतीय न्यायालयांच्या इतिहासात गेल्या दशकात प्रकर्षाने रूढ झालेला आहे. दि. ७ मे २०२२ रोजी रायगड जिल्ह्यात झालेल्या लोकन्यायालयात अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली असून वादपूर्व व दाखल अशी एकूण १८,६६५ प्रकरणे सामंजस्याने मिटवण्यात यश आले आहे असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधिश संदीप स्वामी यांनी माहिती दिली.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण भारतभर राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये न्यायालयांतील प्रलंबित प्रकरणे तसेच न्यायालयात दाखल होण्यापूर्वीची प्रकरणे ठेवण्यात आली होती. रायगड जिल्ह्याच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विभा प्र. इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यामध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायगड जिल्ह्यातील दाखलपूर्व व प्रलंबित अशी एकूण ८०,२९० प्रकरणे लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी दाखलपूर्व १७,८९३ व प्रलंबित प्रकरणांपैकी ७७२ प्रकरणे अशी एकूण १८.६६५ प्रकरणे सामंजस्याने मिटवून लोक अदालतीमध्ये निकाली निघाली व त्याव्दारे पक्षकारांना एकुण ९ कोटी ९१ लाख ६१ हजार १३ रूपयाची तडजोड रक्कम मिळवून देण्यात आली.

तीन जोडप्यांचा लोक अदालत मध्ये संसार जुळला
अलिबाग येथील लोकन्यायालयात ३ जोडप्यांचा ज्यामध्ये जेष्ठ नागरिक पती पत्नी होते त्यांचा सामंजस्याने वाद मिटल्यामुळे नादांयला गेली त्या पक्षाकरांचा पॅनलवरील न्यायधिशांनी फुल देवून सत्कार केला व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

रायगड जिल्ह्यातील विविध न्यायालयांत ४३ लोक अदालतीचे कक्ष स्थापन करण्यात आले होते. लोक अदालतीमध्ये पक्षकारांना न्यायालयात येण्याची सक्ती न करता व्हिडीओ कॉलचा वापर करूनसुध्दा प्रकरणे मिटविण्यात आली.

या लोक न्यायालयाला यशस्वी करण्यासाठी सर्व न्यायिक अधिकारी, वकील वर्ग, जिल्हा परिषद, रायगड, पोलीस अधिक्षक रायगड व सर्व पोलीस कर्मचारी, सर्व पक्षकार यांनी भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विभा इंगळे व न्यायाधिश तथा सचिव संदीप स्वामी यांनी सर्वांचे आभार मानले.

Exit mobile version