अक्कादेवी धरणात पर्यटकांची मांदियाळी
। उरण । वार्ताहर ।
वर्षा सहलीसाठी आवडते आणि निसर्गरम्य असलेले चिरनेर हे ठिकाण आता धुक्यात हरवून गेले आहे. पावसाने मुसळधार सुरुवात केल्याने चिरनेर निसर्गाच्या कुशीत डोंगरदर्यात असणारे अक्कादेवी धरण भरून वाहू लागल्याने रविवारी सुट्टीच्या दिवशी अनेक पर्यटकांनी आपल्या कुटुंबासह येथील फेसाळणार्या पाण्याचा आनंद लुटण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या पर्यटकांच्या वर्दळीमुळे छोट्या मोठ्या व्यवसायिकांनी समाधान व्यक्त केले.
उरण तालुक्यातील ऐतिहासिक चिरनेर गाव अर्थात 25 सप्टेंबर 1930 रोजीचा ब्रिटिश सत्तेविरोधात झालेला स्वातंत्र्यलढा हा याच अक्कादेवी धरणाच्या जंगल परिसरात झाला होता. याच ठिकाणी असणारे हे निसर्गरम्य अक्कादेवी धरण पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे. वर्षासहलीसाठी दर रविवारी व सुट्टीच्या दिवशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असतात. अक्कादेवी धरणाजवळ आदिवासी वाडी आहे. शहरी पर्यटकांना डोंगर खोर्यातील आदिवासींचे जीवन कसे असते, याचे यथार्थ दर्शन त्यांना येथे घडत असते. निसर्गरम्य परिसर आणि धरणातून पडणारे पाणी याचा सुयोग्य मेळ या ठिकाणी गेल्यानंतर सहाजिकच अनुभवास येत असल्यामुळे हे धरण धोकाविरहित आहे.
चिरनेर गावाजवळ हे धरण असल्याने या ठिकाणी येणार्या पर्यटकांना गावातील व्यावसायिक, चायनीज फूड प्रमाणे खाद्य पदार्थ देखील सहज उपलब्ध होत आहेत. धरण क्षेत्राच्या अगदी मध्यभागी दगडी बांधिव विहीर असून या धरणाचा परिसर अत्यंत विलोभनीय व सुखावणारा आहे. ऐतिहासिक व तीर्थक्षेत्राचा वारसा लाभलेल्या चिरनेर गावात आलेले अनेक पर्यटक आपल्या कुटुंबासह प्रथम श्री महागणपतीचे दर्शन घेतात. तसेच, स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करत अक्कादेवी धरण परिसरातील निसर्गरम्य परिसराचा आनंद लुटत झुळझुळ वाहणार्या अक्कादेवी धरणातील पाण्याचा मनसोक्तपणे आनंद घेतात. यावेळी हा परिसर पर्यटकांनी फुलून गेला होता. तरी चिरनेर ग्रामपंचायतीने या परिसराचा विकास करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी नवी मुंबई येथील पर्यटक स्वाती पाटील यांनी व्यक्त केली आहे.