इमेज कॅलेंडर छायाचित्र स्पर्धेचा निकाल जाहीर
प्रथम क्रमांक अतुल मोरे यांनी पटकाविला
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील नैसर्गिक सौंदर्याची इमेज आपल्या कॅमेरात बंद करण्याचे मोह सर्वांना होतो. अशा रायगड जिल्ह्यातील हौशी आणि व्यावसायिक छायाचित्रकारांच्या कलेला वाव देण्यासाठीच प्रयत्न इमेज कॅलेंडर गेले चार वर्ष सातत्याने करीत आहे. यंदाही २०२२ च्या वार्षिक कॅलेंडरसाठी छायाचित्र स्पर्धा आयोजित केली होती. या छायाचित्र स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यातून सादर झालेल्या शेकडो छायाचित्रांमधून १२ छायाचित्रांची निवड मान्यवर परीक्षकांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या छायाचित्र स्पर्धेत छायाचित्रकार अतुल मोरे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. द्वितीय क्रमांक जुनेद तांबोळी आणि तृतीय क्रमांक राकेश मोरे यांच्या छायाचित्रांचा आला आहे. यामुळे २०२२ च्या इमेज कॅलेंडरच्या दिनदर्शिकेमध्ये रायगड जिल्ह्यातील निसर्गाची छबी अवतरलेली पाहावयास मिळणार आहे.
दिनदर्शिकेच्या विश्वात इमेज कॅलेंडरने आपले स्थान अढळ करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु ठेवली आहे. तीन वर्षांच्या यशस्वी प्रसिद्धीनंतर चौथ्या वर्षीदेखील कॅलेंडर प्रकाशन करण्याच्या दिशेने अलिबागच्या छायाचित्रकारांच्या त्रिकुटाने वाटचाल केली आहे. यंदा कॅलेंडरच्या प्रत्येक पानावर रायगड जिल्ह्यातील निसर्ग चित्र , गड आणि किल्ल्यांचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यासाठी इमेज कॅलेंडर संस्थेने छायाचित्र स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला जिल्ह्यातून शेकडो छायाचित्रकारांचा सहभाग लाभला होता.
प्रथम क्रमांक अतुल मोरे , द्वितीय क्रमांक जुनेद तांबोळी , तृतीय क्रमांक राकेश मोरे , चतुर्थ क्रमांक नितीन शिर्के , पाचवा क्रमांक मंदार धुळप , सहावा क्रमांक महेंद्र म्हात्रे , सातवा क्रमांक कल्पेश गणेश पाटील , आठवा क्रमांक निलेश पाटील , नववा क्रमांक कल्पेश जयवंत पाटील , दहावा क्रमांक प्रथमेश घरत , अकरावा क्रमांक आझाद जाधव आणि बाराव्या क्रमांकासाठी मनोज पाटील यांच्या छायाचित्राची निवड करण्यात आली आहे.
स्पर्धेसाठी सादर करण्यात आलेल्या शेकडो छायाचित्रांमधून कॅलेंडरसाठीच्या बारा पानांसाठी निवड करणे जिकरीचे होते. यासाठी इमेज कॅलेंडर संस्थेने पुणे येथील ज्येष्ठ चित्रकार मुकुंद बहुलेकर यांची निवड केली होती. त्यांच्या परीक्षणानंतर बारा छायाचित्रणाची निवड करण्यात आली आहे. क्रमांकानुसार कॅलेंडरच्या पहिल्या पानावरुन छायाचित्रकारांची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती इमेज कॅलेंडरचे संस्थापक जितू शिगवण यांनी दिली आहे.







