हिंद-दी-चादर शहिदी समागम कार्यक्रम
| रायगड | प्रतिनिधी |
श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त खारघर नवी मुंबई येथे आयोजित हिंद दी चादर या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे सविस्तर आढावा घेतला. या समागम कार्यक्रमासाठी कोकण सज्ज झाला आहे. यावेळी डॉ. सूर्यवंशी यांनी सर्व यंत्रणांना सूचना दिल्या की, या ऐतिहासिक व प्रेरणादायी कार्यक्रमाच्या आयोजनात कोणत्याही त्रुटी राहू नयेत, यासाठी सर्व प्रकारे प्रचार प्रसिद्धी करावी. येणाऱ्या भाविकांची अंदाजित संख्या तपासावी आणि त्याप्रमाणे व्यवस्थेचे काटेकोर नियोजनही करावे.
या कार्यक्रमाच्या प्रचार प्रसिद्धीसाठी सर्व स्तरातून सर्व यंत्रणांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करावा. वेबसाईटचा जास्तीत जास्त वापर करावा. स्वच्छता मोहिमा राबवाव्यात. आरोग्य मेळावे घ्यावेत. ग्रामसभा घ्याव्यात. शाळांमधून पालकसभा घ्याव्यात. शाळा- महाविद्यालयांमधून चित्रफीत दाखवावी माहितीपट दाखवावेत अशा विविध माध्यमांमधून जास्तीत जास्त प्रमाणात प्रसारित करावे.
आरोग्य यंत्रणा सज्ज
ओवे मैदान, खारघर, नवी मुंबई येथे होणाऱ्या मुख्य सोहळ्यासाठी राज्यासह देशाच्या विविध भागांतून सुमारे 15 लाखांहून अधिक भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोंकण विभागांतर्गत येणाऱ्या ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि मुंबई या जिल्ह्यांत दि. 10 ते 25 फेब्रुवारी या कालावधीत अखंड मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या नियोजनात जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्था, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा सक्रिय सहभाग आहे.
आरोग्य शिबिरे
या कालावधीत दरम्यान गाव व वस्ती स्तरावर आयोजित विशेष वैद्यकीय शिबिरांना प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत 1765 आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांमधून एकूण 65 हजार 96 नागरिकांनी लाभ घेतला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 532 शिबिरे आयोजित करण्यात आली असून, ठाणे जिल्ह्यात 457, पालघर जिल्ह्यात 240, रायगड जिल्ह्यात 423 आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात 113 शिबिरे पार पडली आहेत. या शिबिरांमधून ठाणे 27078, पालघर 9034, रायगड 14883, रत्नागिरी 19816, आणि सिंधुदूर्गमध्ये 4 285 नागरिकांनी लाभ घेतला.
ग्रामपंचायतीचा सहभाग
ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील एकूण 2 हजार 998 ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे. माहिती ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्यासाठी या ग्रामपंचायतींमध्ये लाऊडस्पीकरद्वारे प्रसिद्धी करण्यात आली आहे. गावांच्या प्रवेशद्वारांवर आणि महत्त्वाच्या ठिकाणी एकूण 2 हजाराहून अधिक जनजागृती बॅनर्स लावण्यात आले आहेत. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या सर्व जिल्ह्यांमध्ये ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती, ग्रामसभा, स्वच्छता मोहीम आणि प्रसिद्धी उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.
विद्यार्थ्यांचा सहभाग
आतापर्यंत ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांतील एकूण 15 हजार 972 शैक्षणिक संस्थांनी विविध कार्यक्रमांत सहभाग नोंदविला असून, सुमारे 22 लाख 38 हजार 990 विद्यार्थ्यांनी यात सक्रिय सहभाग घेतला आहे. शिक्षण विभागाच्या 14 फेब्रुवारी पर्यंतच्या अहवालानुसार, जिल्हा परिषद व अनुदानित प्राथमिक शाळा, खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालये, तसेच आश्रमशाळा, निवासी शाळा आणि वसतिगृहे यामध्ये विविध स्पर्धा, व्याख्याने, निबंध लेखन, वक्तृत्व, चित्रकला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.







