नववर्षात नौदलाचे सामर्थ्य वाढणार

तारागिरी, अंजदीप युद्धनौका लवकरच सेवेत

| मुंबई | प्रतिनिधी |

नववर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात लक्षणीय वाढ होणार आहे. अत्याधुनिक तारागिरी स्टेल्थ फ्रिगेट आणि अंजदीप अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट या युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यता आहे. तारागिरी ही नीलगिरी वर्गातील (प्रोजेक्ट 17ए) चौथी स्टेल्थ फ्रिगेट असून, या मालिकेतील एकूण सात युद्धनौका नौदलात दाखल होणार आहेत. अंजदीप ही नौदलाला मिळणारी चौथी अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट असून, अशा एकूण 16 नौका नौदलात येणार आहेत.

आधुनिक शस्त्रांनी सज्ज तारागिरी
तारागिरी फ्रिगेट दीर्घ पल्ल्याच्या ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे. स्वदेशी रॉकेट लॉन्चर, अत्याधुनिक कॉम्बॅट मॅनेजमेंट सिस्टीम, फायर कंट्रोल सिस्टीम, एमएफ-स्टार सर्व्हिलन्स रडार आणि बराक-8 पृष्ठभाग ते आकाश क्षेपणास्त्र प्रणाली यामध्ये आहेत. प्रोजेक्ट 17 ए अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या या सर्वाधिक आधुनिक युद्धनौका समजल्या जातात. नव्या संरचनेमुळे रडार, इन्फ्रारेड, ध्वनी आणि चुंबकीय ठसा कमी झाला असून, शत्रूला ही युद्धनौका शोधणे अवघड ठरणार आहे.
नीलगिरी वर्गाची पुढची झेप
नीलगिरी वर्गातील युद्धनौकांमध्ये आक्रमक क्षमता, स्टेल्थ तंत्रज्ञान, ऑटोमेशन, टिकाऊ रचना आणि मॉड्युलर बांधकाम पद्धतीत मोठ्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. सुमारे 6,670 टन वजनाच्या या फ्रिगेट्स अत्याधुनिक शस्त्रे, सेन्सर आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर प्रणालींनी सज्ज असून भारतीय नौदलाच्या आणखी सक्षम करणार आहेत
अंजदीप घेणार पाणबुड्यांचा शोध
नौदलाला मिळणाऱ्या 16 शॅलो वॉटर क्राफ्टपैकी आतापर्यंत तीन युद्धनौका ताफ्यात दाखल झाल्या आहेत. जानेवारीत अंजदीप या आणखी एका युद्धनौकेचा समावेश होणार आहे. पाणबुडीचा शोध, समुद्री गस्त, शोध व बचावकार्य तसेच कमी तीव्रतेच्या समुद्री मोहिमांसाठी ही अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. सुमारे 77 मीटर लांबीच्या अंजदीप या नौकेत अत्याधुनिक टॉर्पीडो, स्वदेशी अँटी सबमरीन रॉकेट तसेच उथळ पाण्यात कार्यक्षम सोनार प्रणाली बसवण्यात आली आहे.
Exit mobile version