काँग्रेस विरोधात राष्ट्रवादीत नाराजी

शरद पवारांसमोर पदाधिकार्‍यांच्या तक्रारी
मुंबई | प्रतिनिधी |
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आजी माजी आमदारांची बैठक बोलावली.त्यांच्याकडून मतदारसंघाचा आढावा घेतला. या बैठकीत काँग्रेस विरोधात नाराजीचा सूर दिसून आला. राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकार्‍यांनी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीलाच शत्रू मानत असल्याची खंत व्यक्त केल्याची माहिती आहे.
मतदारसंघामध्ये व्यवस्थित कामे सुरू आहेत की नाही, हे जाणून घेण्यासाठी शरद पवारांनी बैठक आयोजित केली होती. यावेळी अनेक माजी आमदारांनी इतर खात्याकडून काम होत नसल्याची तक्रार करण्यात आली. त्यावर राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ’तीन पक्षाचं सरकार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष कधी कधी आपल्या आमदाराला झुकतं माप देते. दोन पक्षांचे सरकार असेल त्यावेळीही असं घडत असते. प्रत्येकाचा प्रत्येक प्रश्‍न सुटू शकतो असे नाही,असे मलिक म्हणाले.

राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी तक्रारी केल्या त्याचे आम्ही समाधान करण्याचा प्रयत्न करू. संबंधित माजी आमदार आणि विद्यमान आमदार यांचे कामे होत आहेत की नाही यामध्ये राष्ट्रवादीचे मंत्री लक्ष घालतील. कामे होत नसतील तर का होत नाही? हे तपासले जाईल,’
नवाब मलिक,प्रवक्ते राष्ट्रवादी

दरम्यान, राज्यात तीन पक्षाचे सरकार असल्याने अनेकदा पक्षांमध्ये लहान-मोठे अंतर्गत वाद होताना दिसतात. तसेच कधी काँग्रेसकडून सेना-राष्ट्रवादीवर टीका केली जाते, तर कधी सेनेकडून काँग्रेसला टार्गेट केलं जातं. गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सेना-राष्ट्रवादीने आघाडी करावी, माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतरही तिन्ही पक्षात आलबेल आहे की नाही? अशी चर्चा रंगली होती. आता राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी काँग्रेसविरोधात नाराजीचा सूर आवळला आहे. यावर काँग्रेसकडून अद्याप कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Exit mobile version