पनवेल येथील खानावमध्ये शेतकरी मेळावा
| पनवेल | जसपाल सिंग नेओल |
नैनाच्या निमित्ताने रायगडच्या शेतकर्यांना मोठ्या फसवणुकीला सामोरे जावे लागले आहे. प्रकल्पाचा जो चेहरा दाखवला होता, तो खूपच आशादायी आणि सकारात्मक होता. पण, आज जर या प्रकल्पाचा विचार केला, तर सर्वांना फसवण्याची ही योजना आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनासारखे नैनाविरोधी आंदोलन आपल्याला घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी पनवेल येथील खानाव येथे आयोजित करण्यात आलेल्या नैनाविरोधी शेतकरी मेळाव्यात केले. तालुक्यातील खानाव याठिकाणी असलेल्या स्वप्नपूर्ती चित्रनगरी येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी, आ. जयंत पाटील, आ. बाळाराम पाटील, जी.आर. पाटील यांच्यासह पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, क्रांतिकारी सेवा संघाचे अध्यक्ष नामदेव फडके, सुरेश ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, नगरसेवक गणेश कडू, प्रज्योती म्हात्रे, अनुराधा ठोकळ, जि.प. सदस्य विलास फडके, पं.स. सदस्य स्वप्नील भुजंग, वामन शेळके, सुभाष भोपी, सुरेश पवार, राजेश केणी, अनिल ढवळे, नरेंद्र भोपी, नारायण पाटील, जगन फडके, सुदाम वाघमारे, बाळाराम फडके, डी.के. भोपी, बबन फडके, अनिल ढवळे, शेखर शेळके, सुरेश पाटील, रामचंद्र फुलोरे आदींसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार जयंत पाटील म्हणाले, अगोदर मला वाटले मैनेपेक्षा गोरीगोमटी नैना आहे. पण, तो माझा गैरसमज होता. माझ्यासारखा आमदाराचा गैरसमज होऊ शकतो, तर तुमचाही झाला असेल. पनवेल परिसरात नैना विरोधाची आग धगधगत आहे. यावेळी विजय गडगे यांनीही नैना म्हणजे केवळ बिल्डरांचा विकास, मात्र शेतकर्यांना भकास करणारे आहेत. यावेळी नैनाविरोधात एकत्र लढलो तर नक्कीच यश मिळेल, असा दावा केला. नैनामध्ये ज्या गावाची जागा गेली आहे, त्यांना त्याच गावात जागा द्या, अन्य गावात जागा कशाला देता, हे सर्व बेटरमेंट चार्ज मिळण्यासाठी केले जात असल्याचा आरोप या सभेत करण्यात आला. आपला फायदा करून घ्यायचा असेल तर संघटना मजबूत झाली पाहिजे. घरात बसून राहिलो तर नुकसान होईल, आपण सारे पेटून उठलो पाहिजे आणि या सरकारला घाम फोडला पाहिजे, असे मत व्यक्त करण्यात आले. नैनाचा कारभार नियोजनशून्य असल्याचा आरोप शेतकर्यांच्यावतीने करण्यात येऊन गेल्या आठ वर्षांपासून एकही वीट रचली नसल्याचे सांगितले. लवकरच काही गावांमध्ये शेकडो घरे तुटणार आहेत, याविरुद्ध आवाज उठवायला हवा. शासन झोपडपट्टीत राहणार्या नागरिकांना घरे देत आहेत, मात्र घरात राहणार्यांना उद्ध्वस्त करून झोपडीत राहायला पाठवणार आहे का, असा सवाल यावेळी उपस्थितांमधून राज्य सरकारला करण्यात आला.
- ब्रिटिशांनी लिहिले आहे; भारतात कुठेही जा, पण महाराष्ट्रात नका जाऊ. आणि, महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात जाऊ नका. कारण, तिथे आक्रमक आगरी समाज आहे. नैना ही मैनापेक्षा वाईट गोरीगोमटी आहे. नैना समर्थक अधिकारी आणि राजकीय नेत्यांना गावबंदी घाला. – आ. जयंत पाटील, सरचिटणीस शेकाप
- नैनाच्या माध्यमातून विकासाच्या नावाने शेतकर्यांना फसवले जात आहे. पण, नियमावली आणि प्रकल्प पाहता, भूमीपुत्र शेतकर्यांच्या थडग्यांवर विकासाचे मनोरे रचण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्याला स्थानिकांचा विरोध आहे. इथल्या नागरिक आणि शेतकर्यांसह खांद्याला खांदा लावून महाराष्ट्रातील शेतकरी लढणार हे सांगायला आणि साथ द्यायला मी आलो आहे. – खा. राजू शेट्टी, अध्यक्ष, शेतकरी स्वाभिमानी संघटना
शेतकर्यांनो, सावधान!
शेतकर्यांना उद्ध्वस्त करू पाहणार्या नैना प्रकल्पाचा भस्मासुर अक्राळ-विक्राळ रूप धारण करण्यापूर्वी शेतकर्यांनी सावध होणे, ही काळाची गरज बनली आहे. याच भूमिकेतून नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समितीने प्रकल्पबाधित शेतकर्यांना एकत्र आणले आहे. नैना आणि अन्य प्रकल्प हे कितीही विकासाचे चित्र उभे करत असले, तरीसुद्धा ते शेतकर्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन कायमचे हिरावून घेणार आहेत, याचे भान शेतकर्यांना असले पाहिजे.