। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारतात लसीकरण जलद गतीने केले आणि त्यासाठीची धोरणे लवचीक ठेवली, तरच तेथील लोकांचे जीव वाचवता येतील, असे लॅन्सेट या वैद्यकीय नियतकालिकाच्या अहवालात म्हटले आहे.रिस्पॉन्सिव्ह, अँड अगाइल व्हॅक्सिनेशन स्ट्रॅटेजिज अगेन्स्ट कोव्हिड 19 इन इंडिया अहवाल लॅन्सेट ग्लोबल हेल्थ यांनी प्रसिद्ध केला असून अहवालात पुढे म्हटले आहे, की करोनाचा प्रसार असलेली क्षेत्रे निवडून त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. देखरेख व रुग्णांचा शोध महत्त्वाचा असून चाचणी होकारात्मक येण्याआधीच जर पुरेशी काळजी घेतली तर त्याचा उपयोग होऊ शकेल. लसीकरणासाठी कमीत कमी व्यवस्थात्मक यंत्रणा वापरूनही त्याचा मोठा परिणाम साधता येईल. 1918 व 2009 च्या इन्फ्लुएंझा साथींचा विचार केला तर आताची साथ वेगळी आहे, त्यात संसर्गाच्या लाटा येत आहेत. त्यासाठी लवचीक धोरणे आखून लसीकरण वेगाने करणे गरजेचे आहे. त्यामुळे लोकांचे जीव वाचतील व रोजीरोटीही चालेल, कारण कोविड 19 मुळे अनेक ठिकाणी टाळेबंदी करावी लागली आहे.
भारतात गावांमध्ये लसीकरण केंद्रे उभारण्यात आली असून शहरी भागात निवासी कल्याण संस्थांमार्फत लसीकरण केले जात आहे. सामाजिक व्यवस्थांचा वापर, पार्किंगच्या जागांचा वापर लसीकरणासाठी केला जात आहे. फिरत्या लसीकरण सुविधाही आहेत. त्यामुळे लोकांना आता लसीकरण करून घेणे सोपे होत आहे. मात्र, काही ठिकाणी लसीकरण सहज उपलब्ध नाही. त्यामुळे वृद्धांना वाहन सुविधा देणे किंवा त्यांना घरी जाऊन लस देणे हे उपाय करता येतील, असे अहवालात नमूद केले आहे.