नेरळ-कळंब रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा

। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील माथेरान-नेरळ-कळंब या राज्यमार्ग रस्त्यावर आरसीसी काँक्रीटचे काम सुरु आहे. मात्र गेली दीड महिना रस्त्यावर काँक्रीटीकरण करण्याचे काम बंद झाले असून ठेकेदाराने रस्ता खोदून ठेवला असून काँक्रिटीकरण केलेले नाही. ठेकेदाराने बनवून ठेवलेल्या मृत्यूच्या सापळ्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.

गेली दहा वर्षे खराब झालेल्या रस्त्यासाठी चार कोटींचा निधी मंजूर झाला होता. त्या निधीमधून सार्वजनिक बांधकाम विभागाने 900 मीटर लांबीचा सिमेंटचा रस्ता आणि तीन किलोमीटर लांबीच्या डांबरी रस्त्याचे काम केले. मात्र दहिवली पुलाच्या पुढील रस्ता करताना खड्डे भरून त्यावर फक्त डांबराचा पट्टा मारला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अशा कारभाराचा स्थानिकांना चांगलाच फटका बसत आहे. ठेकेदार संथगतीने रस्त्याचे काम करीत असल्यानेे वाहतूक कोंडी होते. त्यामुळे नेरळ-कळंब मार्गावर एसटी अद्यापही बंदच आहे.


पावसाळा सुरु झाला असताना आता पुढे कामे होण्याची शक्यता कमी आहे. मात्र ठेकेदार कंपनीने रस्त्याच्या खोदलेल्या भागात खडीचे ढिगारे टाकून ठेवले आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहनचालकांसाठीचे कोणतेही सूचनो फलक लावले नाहीत. परिणामी रात्री अनेक वाहन चालक ठेकेदारांनी टाकून ठेवलेल्या मातीच्या ढिगार्‍यांवर धडकत आहेत. या मार्गावर सातत्याने अपघात होत असून सार्वजनिक बांधकाम खात्याने त्या ठिकाणची सुरक्षिततेची जबाबदारी घेतली नाही तर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version