| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ गावातील क्रिकेट खेळाडूंना वाव मिळावा यासाठी दरवर्षी नेरळ प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजन केले जाते. प्रथमेश मोरे यांच्या पुढाकाराने आणि डी 3 ग्रुप यांच्या आयोजनातून तीन दिवसीय नेरळ प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजन कोतवालवाडी ट्रस्टच्या मैदानावर करण्यात आले होते. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नेरळ किंग संघाने नेरळ डेअर डेव्हील्स संघाचा पराभव करून विजय मिळविला आणि नेरळ प्रीमियर लीग स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.
नेरळ प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजन कोतवालवाडी ट्रस्टच्या मैदानावर करण्यात आले होते. तीन दिवसीय नेरळ प्रीमियर लीग स्पर्धेचे उदघाटन रोहिदास मोरे, सुनीता मोरे आणि प्रथमेश मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेमध्ये नेरळ लायन्स, नेरळ इंडियन्स, नेरळ किंग्स, नेरळ नाईट रायडर्स, नेरळ वॉरियर्स, नेरळ डेअर डेव्हील्स, नेरळ रॉयल चॅलेंजर्स, नेरळ सनराइजर्स, नेरळ सुपर किंग्स आणि नेरळ रॉयल या संघानी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे साखळी पद्धतीने सामने खेळवण्यात आले आणि स्पर्धेसाठी भिवंडी येथून पंच बोलावण्यात आले होते. तर स्पर्धेचे टेनिस क्रिकेट या यु ट्यूब चॅनेल वरून थेट प्रक्षेपण केले जात होते. स्पर्धेच्या आयोजनात अक्षय चव्हाण, परेश सुर्वे, उदय मांडे, चेतन गुरव यांच्यासह डी 3 ग्रुप यांचा सहभाग होता.
स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नेरळ किंग्स संघाने प्रथम फलंदाजी करताना पाच षटकात 80 धावांचे लक्ष्य नेरळ डेअर डेव्हील्स संघाला दिले होते, मात्र ते लक्ष्य पार करण्यात नेरळ डेअर डेव्हील्स संघाला यश आले नाही आणि त्यामुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आणि नेरळ किंग्स संघाने नेरळ प्रिमीयर लीगचे विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत नेरळ रॉयल संघाने तिसरा तर नेरळ इंडियन्स संघाने चौथा क्रमांक मिळविला. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू रोशन कातकरी याने खिताब पटकावला. तर अंतिम फेरीतील मॅन ऑफ दि मॅच अतिश शिंगवा ठरला असून, उत्कृष्ट फलंदाज म्हणून अतिश शिंगवा आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून मुस्तकीम खान याला सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडू म्हणून आदित्य डायरे यास सन्मानित करण्यात आले. अंतिम विजेत्या संघाला सुनीता मोरे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.







