नेरळ रेल्वे फाटक तूर्तास बंद नाही

| नेरळ | प्रतिनिधी |

मध्य रेल्वे मार्गावरील नेरळ येथील फाटक क्रमांक 21 हे अभियांत्रिकी कामांसाठी दहा दिवस बंद ठेवले जाणार होते. मात्र, सध्या सुरू असलेल्या परीक्षा लक्षात घेऊन फाटक बंद करून वाहतुकीची गैरसोय करू नये, अशी भूमिका स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी घेतली होती. तसेच, हे फाटक दहा ऐवजी पाच दिवस बंद ठेवले जावे, असे देखील रेल्वे प्रशासनाला ठणकावून सांगण्यात आले होते. त्यामुळे सोमवार, दि.6 एप्रिल पासून बंद होणारे फाटक सध्यातरी बंद राहणार नाही.

मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील नेरळ जंक्शन स्थानकाच्या बाहेर असलेले फाटक हे सर्वात गजबजलेले फाटक समजले जाते. नेरळ हे गाव रेल्वेच्या दोन बाजूंना विभागले असल्याने हे फाटक वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचे समजले जाते. परंतु, हे फाटक अभियांत्रिकी कामासाठी दि.6 ते 16 एप्रिलपर्यंत बंद ठेवले जाणार होते. त्याबाबत रविवारी (दि.5) रेल्वे प्रशासनाने फाटक परिसरात फलक लावून वाहन चालकांना सूचना देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सध्या सुरू असलेल्या परीक्षा लक्षात घेऊन फाटक बंद करू नये, अशी मागणी नेरळ ग्रामपंचायतीकडून रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली. परंतु, सोमवारी (दि.6) फाटक बंद होणार अशी सर्वत्र भीती व्यक्त केली जात होती. तसेच, विद्यार्थ्यांना ऐन परीक्षेच्या काळात शाळेत लवकर पोहचावे लागते आणि फाटक बंद ठेवले तर विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत कसे सोडणार, असा प्रश्न पालक वर्गाला आणि स्कूल बसेस चालकांना पडला होता. शेवटी सोमवारी नेरळ ग्रामपंचायतीकडून ग्रामपंचायत अधिकारी अरुण कार्ले यांनी नेरळ रेल्वे स्थानक प्रबंधक गणपत पाटील यांची भेट घेतली. यावेळी कर्जत पंचायत समिती सदस्य भगवान चंचे तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. लोकप्रतिनिधी यांच्याकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली. सलग दहा दिवस कामे करण्यासाठी फाटक बंद ठेवण्याची गरज आहे काय? असा प्रश्न करण्यात आला. त्यानंतर रात्रीच्या वेळी काम करावे असे सुचवण्यात आले. शेवटी अभियांत्रिकी विभागाने रुळाखालील खडी यात होणारी खिज याबद्दल परिस्थिती समजावून सांगितल्यावर दहा ऐवजी पाच दिवसात कामे पूर्ण करण्यावर एकमत झाले. शेवटी 6 एप्रिल ऐवजी 10 एप्रिलपासून फाटक बंद ठेवण्यावर एकमत झाले.

Exit mobile version