नवीन वर्षाची सुरूवात नाक दाबून

रस्त्याची साईटपट्टी बनतेय कचरा कुंडी; ग्रामीण भागातील आरोग्य धोक्यात

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

अलिबाग-रेवदंडा व अलिबाग-रोहा मार्गावरील रस्त्यांच्या दुतर्फा ठिकठिकाणी कचरा टाकला जात आहे. पर्यटकांसह स्थानिकांना नाक दाबून प्रवास करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. रस्त्याची साईडपट्टी कचराकूंडी बनली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भिती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे आक्षी ते नवेदर बेली रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्याचा ढिगारा साचला आहे. त्याकडे मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे स्थानिकांस पर्यटकांना नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच नाक दाबून प्रवास करावा लागला.



रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागाची लोकसंख्या 16 लाख 64 हजारहून अधिक आहे. त्यात 2 हजारहून अधिक गावे व वाड्यांचा समावेश आहे. तसेच, जिल्ह्यात 810 ग्रामपंचायती आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहवे, येथील रुग्णांना तात्काळ रुग्ण सेवा मिळावी यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अखत्यारित 54 प्राथमिक आरोग्य केंद्र व 288 उपकेंद्र आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन या विभागामार्फत ग्रामीण भागात स्वच्छता राखण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. वेगवेगळ्या योजना राबवून नागरिकांमध्ये जनजागृती केली जाते. काही ग्रामपंचायतींनी पंधरा वित्त आयोगातून घंटा गाडी खरेदी केल्या आहेत. मात्र, कचरा कुठे टाकायचा, हा प्रश्न गंभीर झाला आहे. घनकचरा व्यवस्थापन ग्रामपातळीवर नाही. त्यामुळे आक्षी ते नवेदरबेली रस्त्याच्या बाजूला ठिकठिकाणी कचरा टाकला जात आहे. रात्रीच्या वेळी काही महाभाग हा प्रकार करीत आहेत. त्यामुळे अनेक रस्त्यांची साईट पट्टी कचरा कुंडीचा अड्डा बनू लागली आहे. रस्त्याच्या बाजूला कचरा पडल्याने त्याचा नाहक त्रास प्रवासी व स्थानिकांस पर्यटकांना होत आहे. त्यामुळे वर्षाची सुरूवातीलाच नाक दाबून प्रवास करण्याची नामुष्की त्यांच्यावर येत आहे. तसेच, या ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा वावर देखील वाढू लागला आहे. त्यामुळे वाटसरूला चावण्याची तसेच गाडीसमोर येऊन मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, रस्त्याच्या बाजूला पडलेल्या कचऱ्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य धोक्यात येण्याची भिती निर्माण झाली आहे. याकडे जिल्हा परिषद प्रशासनाकडून गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे.

कंपोस्ट पीट प्रकल्प नावापुरताच
कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील कचऱ्याचे व्यवस्थानपन करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने ग्रामपंचायत स्तरावर कंपोस्ट पीटची संकल्पना राबविण्यात आली. ग्रामपंचायतीने पुढाकार घेत अनेक ठिकाणी कंपोस्ट पीट उभारले आहेत. या कंपोस्ट पीटमध्ये कचरा टाकण्याचे काम करण्यात आले. परंतु, या कंपोस्ट पीटवर कचऱ्याचे डोंगर उभे राहत आहे. काही कंपोस्ट पीट रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली तोडण्यातदेखील आले आहेत. त्यामुळे कंपोस्ट पीटची योजनादेखील बारगळी असल्याचे चित्र आहे. खतनिर्मिती करण्यासाठी कंपोस्ट पीट तयार कऱण्यात आले. परंतु, हे कंपोस्ट पीट कचरा कुंडी झाली आहे. अनेक गावांच्या प्रवेशद्वारासमोरच कचरा टाकला जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कंपोट पीट प्रकल्प फक्त नावापूरता अशी परिस्थिती दिसून येत आहे.

आक्षी पुलाजवळ कचरा टाकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. याआधी त्याठिकाणी जाळी लावण्यात आली. तसेच कचरा टाकू नये, असे सुचना फलकही लावण्यात आले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत काही मंडळी रात्रीच्या वेळी याठिकाणी कचरा टाकतात. हे प्रकार थांबणे गरजेचे आहे. कचऱ्यामुळे आरोग्य धोक्यात येण्याची भिती आहे.

-रश्मी पाटील,
सरपंच, आक्षी

Exit mobile version