शोभा यात्रांसह मिरवणुकांतून नववर्षाचे स्वागत

| अलिबाग | प्रतिनिधी |

गुढीपाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त म्हणजे. हा एक सण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्साही वातावरणात साजरा केला जातो. तसेच, पाडव्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होते. भारतीय परंपरेनुसार या दिवसाला ऐतिहासिक आणि पौराणिक असे महत्त्व आहे. रायगड जिल्ह्यातील विविध ठिकाणी गुरूवारी (दि.19) प्रत्येकाने आपआपल्या घरासमोर रांगोळी काढून परिसर सजवला होता. सकाळी मुहूर्तावर प्रत्येकाने आपल्या घरासमोर गुढी उभारून तिची विधीवत पूजा केली. त्यानंतर सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा देत नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले.

पेणमध्ये स्त्री अस्मितेची गुढी


स्त्री अस्मिता आणि सन्मान यांचा जागर पेण शहरात एका भव्य आणि प्रेरणादायी रॅलीच्या माध्यमातून अनुभवायला मिळाला. अंकुर ट्रस्ट व महिला अत्याचार विरोधी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमाने सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने एक ठोस पाऊल टाकले.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणातून सुरू झालेली ही रॅली महात्मा गांधी वाचनालयापर्यंत विविध रंगांनी नटलेली होती. यावेळी पारंपरिक वेशभूषा, लोकनृत्य आणि भुगा घालत महिलांनी आपली सांस्कृतिक ओळख जपत स्त्रीशक्तीचा जागर केला. या रॅलीचे नेतृत्व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली पाटील यांनी केले. विशेष म्हणजे, या यात्रेत सर्व जाती, धर्म आणि विविध सामाजिक स्तरांतील महिलांचा उत्स्फुर्त सहभाग पाहायला मिळाला. एकल महिला, मतिमंद आणि अनाथ मुलींनाही सन्मानाने सहभागी करून घेण्यात आले. त्यामुळे ही रॅली केवळ एक कार्यक्रम न राहता समावेशकतेचा आणि समानतेचा संदेश देणारी चळवळ ठरली.

आई डे केअर, चाईल्ड हेवन, अंकुर ट्रस्ट तसेच बाल संस्कार वर्ग समर कॅम्पमधील मुलेही सहभागी झाली होती. तसेच, शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील मुलींचाही सहभाग उल्लेखनीय ठरला. त्याचबरोबर बालसंस्कार समर कॅम्प, चाईल्ड हेवन आणि अंकुर ट्रस्टच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेवर आधारित नाटिका सादर करून नवीन वर्षाचे स्वागत सादर केले. तसेच, सामाजिक एकोप्याचा संदेश देणारे नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या रॅलीची सांगता महात्मा गांधी वाचनालयात करण्यात आली. यावेळी आपल्या प्रास्ताविकात डॉ. वैशाली पाटील यांनी मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत वंचित आणि दुर्लक्षित घटकांमध्ये एकजूट निर्माण होणे, तसेच सर्व धर्मांमध्ये एकोपा आणि समरसता प्रस्थापित होणे ही परिवर्तनवादी चळवळीची गरज असल्याचे प्रतिपादन केले.


गुढीपाडव्यानिमित्त पारंपरिक पद्धतीने गुढी उभारून पूजन करताना कुटुंबीय. (फोटोः समीर मालोदे)

नववर्षाच्या स्वागतासाठी अलिबागमध्ये ब्राम्हण उत्कर्ष मंडळ आणि अलिबागकरांच्यावतीने शोभायात्रा काढण्यात आली होती. यावेळी पारंपारिक वेशभूषेत, ढोल ताशाच्या गजरात, गुढी नाचवल्या जात होत्या. त्यात काही महिला नववारी साड्या परिधान करून मोटर सायकलवरुन सहभागी झाल्या होत्या.

मुरूडमध्ये बाईक रॅली उत्साहात

मुरुडमध्ये गुढीपाडवा सण सांस्कृतिक व धार्मिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या वर्षीही कुणाल सतविडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणांनी डोक्यावर भगवा फेटा, हातात झेंडे व पारंपरिक पोशाख परिधान केले होते. यावेळी त्यांनी ‌‘कोटेश्वरी माते की जय’, ‌‘जय भवानी जय शिवाजी’च्या घोषणांनी नववर्षाचे स्वागत केले आणि प्रत्येकाला शुभेच्छा दिल्या. यादरम्यान, मुरूड शहरामध्ये मोटार सायकलवरून रॅली काढण्यात आली होती. ही रॅली मुरुड कोटेश्वरी मंदिरापासून ते शहरातील विविध ठिकाणी काढण्यात आली होती. यावेळी कुणाल सतविडकर, रूपेश जामकर, प्रमोद भायदे, आदेश दांडेकर, आशिलकुमार ठाकुर, राहुल कासार, योगेश सुर्वे, महेंद्र मोहिते, आकाश खोत, सिद्धेश खेडेकर, सतेज विरुकुड, प्रशांत कासेकर, अमित गोंजी आदिंसह तरुण वर्ग नागरिक सहभागी झाले होते. रॅली दरम्यान मुरुडचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

खांदा वसाहतीत गुढी पाडवानिमित्ताने मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. नववर्ष शोभायात्रा समितीच्यावतीने भव्य-दिव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत मराठी संस्कृतीचे आकर्षक दर्शन घडले. यावेळी मर्दानी खेळ व महिला सहभागाने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. तसेचव, विविध सामाजिक संदेश देत नागरिकांचे लक्ष वेधण्यात आले. यादरम्यान संपूर्ण परिसरात उत्साह, आनंद आणि पारंपरिक वातावरण अनुभवायला मिळाले.

पनवेलमध्ये गुढी पाडव्याच्या निमित्ताने व नवं वर्षाचे स्वागत भव्य-दिव्य शोभायात्रेने करण्यात येते. यावेळी महिला वर्गाने देवीच्या वेशभूषेत आकर्षक दर्शन घडवून सर्वांचे लक्ष वेधले. त्याचबरोबर मल्लखांब सादरीकरणाने उपस्थितांना थक्क केले, तर लहान मुलांच्या कलेचे विशेष कौतुक झाले. ढोल-ताशा आणि लेझीम पथकांच्या गजरात वातावरण उत्साहपूर्ण झाले. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मराठी संस्कृतीचा आनंद लुटला.

माथेरानमध्ये नववर्ष उत्साहात साजरे


गुढीपाडवा हा सण माथेरानमध्ये मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करण्यात आला. येथील श्रीराम मंदिरात भक्तीपूर्ण वातावरणात पूजाअर्चा करण्यात आली. तसेच, सुश्राव्य भजनांचे कार्यक्रम ठेवण्यात आले, ते हनुमान जयंतीपर्यंत सात दिवस सुरूच असतात. त्याचबरोबर गुढीपाडवानिमित्त ठेवण्यात आलेले कुस्त्यांचे जंगी सामने हे खास आकर्षण ठरले. यावेळी राज्यातील विविध भागांतील पैलवानांनी आवर्जून हजेरी लावून प्रेक्षकांना आकर्षित केले. त्याचबरोबर माथेरानमधील महिला वर्गाने आपआपल्या दारात रांगोळी काढून, गुढी उभारून नववर्ष सुखासमाधानाने जावो, अशी प्रार्थना केली.

Exit mobile version