शोभा यात्रांसह मिरवणुकांतून नुतन वर्षाचे स्वागत

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

साडेतीन मुहूर्तांपैकी गुढीपाडवा हा दिवस एक महत्वाचा मानला जातो. हिंदू नववर्ष म्हणून साजरा केला जातो. गुढीपाडव्यानिमित्त जिल्ह्यात गुरुवारी (दि.19) सकाळपासून हिंदू नव वर्षाचे जल्लोष साजरा केला जाणार आहे. 30 हून अधिक ठिकाणी मिरवणुका, शोभा यात्रांतून ढोल ताशांच्या गजरात जिल्ह्यात नुतन वर्षाचे स्वागत केले जाणार आहे. सकाळपासून विधीवत पूजा करून या सोहळ्याला सुरुवात केली जाणार आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या संस्था, संघटनाच्या वतीने गुढीपाडव्या निमित्त शोभा यात्रा व मिरवणुकांची तयारी गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होती. ढोल ताशासह, मल्लखांब आदी मैदानी खेळांचे सराव करण्यात आले होते. हा उत्सव जल्लोषात साजरा करण्याची तयारी पूर्ण झाली असून गुरुवारी (दि.19) जिल्ह्यामध्ये गुढी पाडवा साजरा केला जाणार आहे. अलिबागमध्ये ब्राह्मण आळी येथे सकाळी गुढी उभारून भव्य अशा रॅलीसह शोभा यात्रेला सुरुवात केली जाणार आहे. अलिबागसह रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये शोभा यात्रा व मिरवणुका काढण्यात येणार आहेत. जिल्ह्यात 30 हून अधिक ठिकाणी मिरवणुका व शोभा यात्रा काढून जल्लोष साजरा केला जाणार आहे. पारंपारिक पेहराव करून हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. तसेच इतर 10 ठिकाणी सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये पंधरा ते वीस हजारहून अधिक नागरिक सहभागी होणार आहेत. गुढी पाडव्या निमित्ताने काढण्यात येणाऱ्या मिरवणूका व शोभा यात्रेच्यावेळी मर्दानी खेळांचे प्रदर्शन भरविले जाणार आहेत. लहान मुलांपासून तरुण वर्ग व 40 वयोगटापर्यंत अनेक मंडळी यामध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे या दिवशी रायगड जिल्ह्यात एक वेगळा जल्लोष पहावयास मिळणार आहे.

पोलिसांचा कडेकोट पहारा
गुढीपाडव्या निमित्त रायगड जिल्ह्यात शोभा यात्रा, मिरवणुका काढल्या जाणार आहेत. अनेक ठिकाणी कार्यक्रम होणार आहे. दरम्यान हा उत्सव आनंदात साजरा व्हावा, यासाठी रायगड पोलिसांनी कंबर कसली आहे. जिल्ह्यात 800 हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा पोलीस बंदोबस्त असणार आहे. यावेळी वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच मिरवणूका व शोभा यात्रेचा मार्ग मोकळा राहवा यासाठी 65 हून अधिक वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. यावेळी तीन आरसीपी दल आणि एक अतिशिघ्र दल तसेच पाच स्ट्रायकींग फोर्सचा समावेश असणार आहे. गुढी पाडव्या निमित्ताने काढण्यात येणाऱ्या मिरवणूका व शोभा यात्रेत महिलांचाही सहभाग असणार आहे. त्यामुळे महिला सुरक्षेच्या दृष्टीनेदेखील पोलिसांनी पावले उचलली आहेत.
Exit mobile version