जन्मलेले बाळ आईच्या मायेला पोरके

प्रसूतीनंतर काही तासाच महिलेचा हृदयद्रावक मृत्यू

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

एका 32 वर्षीय महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला. परंतु, काही तासातच ते बाळ आईच्या मायेला पोरके झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात ही घटना घडली असून, रुग्णालयातील वैद्यकीय सुविधांबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील मूळचे रहिवासी असणारे विशाल दुर्गावले हे सध्या अलिबाग तालुक्यात कुरुळ येथे राहात आहेत. त्यांच्या पत्नीला नऊ मार्च रोजी अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. बुधवारी (दि.11) पहाटेच्या सुमारास या 32 वर्षीय महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. प्रसूती सुखरूप व सुरक्षित झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. मुलगा जन्माला आल्यावर कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, प्रसूतीनंतर काही तासातच त्या महिलेला श्वसनाचा त्रास होऊ लागला. प्रकृती बिघाडल्याने त्यांना अतिदक्षता विभागात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, गुरुवारी (दि.12) सायंकाळी त्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. दोन वर्षांपूर्वीच विवाह झालेल्या या दाम्पत्याच्या पहिल्याच अपत्याचा आनंद मातेच्या अकाली निधनामुळे दुःखात बदलला. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली. उपचारांबाबत शंका उपस्थित करत त्यांनी रुग्णालयातील पोलीस चौकीत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. चुकीच्या पद्धतीने उपचार करून डॉक्टरांनी जीव घेतल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील यांच्याशी संपर्क साधला, मात्र तो होऊ शकला नाही. अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात विशेष तज्ज्ञांची कमरता असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण पूर्ण झालेले मंडळी डॉक्टर म्हणून काम करतात. त्यांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना झाल्याची चर्चा सध्या जिल्हा रुग्णालयात आहेत.

Exit mobile version