जुगार अड्डेवाल्यांना धंदा बंद करण्याचे तोंडी आदेश
| रेवदंडा | विशेष प्रतिनिधी |
रेवदंडा शहरात दिवसेंदिवस बोकाळलेल्या मटका जुगाराच्या अवैध धंद्यांविरोधात ‘कृषीवल’ने आवाज उठवल्याने कारवाई न करणार्या पोलिसांचेच धाबे दणाणल्याची चर्चा आहे. ज्या ठिकाणी अवैध धंदे खुलेआम चालतात, त्या ठिकाणांची यादीच कृषीवलने प्रसिद्ध केल्याने रेवदंडा पोलिसांना वरिष्ठांनी चांगलेच झापल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जुगार अड्डेवाल्यांना धंदे त्वरित बंद करण्याचे तोंडी आदेश देण्यात आल्याची चर्चा आहे.
रेवंदडा शहरात ठिकठिकाणी उघडपणे सुरू असलेल्या मटका जुगाराच्या अड्ड्यांविषयी कृषीवलने केलेल्या पर्दाफाश वृत्तानंतर पोलीस यंत्रणेला हालचाल करावी लागली. पोलिसांनी अनेक भागांमध्ये गस्त वाढवली असून, काही ठिकाणी चौकशीही सुरू केली आहे. या अनुषंगाने रेवदंडा शहरात जोरदार चर्चा रंगली असून, कृषीवलच्या बातमीचे स्थानिक नागरिकांकडून विशेषतः महिलावर्गाकडून स्वागत करण्यात येत आहे. पोलिसांनी हप्तेखोरी करुन अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष न करता, कारवाईत सातत्य ठेवून अवैध धंदे समूळ नष्ट करावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, मटका जुगाराचे व्यवहार चालवणार्यांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. काही ठिकाणी अड्डे बंद ठेवण्यात आले आहेत, तर काही ठिकाणी अडकलेले गुत्ते हलवले गेल्याचे स्थानिक सूत्रांकडून समजते. कृषीवलच्या बातमीमुळे शहरात पुन्हा एकदा माध्यमांच्या सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण झाली आहे. पोलीस प्रशासनाने जर वेळेवर योग्य पावले उचलली, तर रेवदंडा शहर मटकामुक्त होण्यास वेळ लागणार नाही, असे बोलले जात आहे.