महाड, पाली, नागोठणे, कर्जतला पुराच्या पाण्याचा वेढा
| रायगड | खास प्रतिनिधी |
जिल्ह्यात पावसाचा हाहाकार सुरुच आहे. अंबा आणि सावित्री नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. तर, कुंडलिका नदी धोका पातळीजवळून वाहत होती. महाड, पाली, नागोठणे, कर्जतला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. कर्जतमधील 1275 हून अधिक नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील हेटवणे धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. जोरदार बरसत असणार्या नदीच्या प्रवाहात अलिबाग-बोरघर येथील एक व्यक्ती वाहून गेला असून, त्यांचा मृतदेह सापडला आहे. पावसाचा कहर असाच सुरु राहणार असल्याने पुढील 24 तास धोक्याचे असून, जिल्ह्याला 27 जुलै रोजीदेखील रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना जिल्हाधिकाऱ्यांकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
रायगडच्या जनतेला दिलासा देण्यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे हे स्वतः फिल्डवर उतरले आहेत. त्यांनी महाड, पाली, नागोठणे येथील पूरपरिस्थितीची पाहणी केली. दोन दिवस पाऊस बरसत असल्याने सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. माणगाव ताम्हिणी घाटात तसेच माणगाव येथे तीन ठिकाणी दरड कोसळली होती. प्रशासनाने ती तातडीने दूर केली आहे. रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी ही सकाळी धोक्याच्या पातळीवरु वाहत होती. त्यामुळे रोहा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. तसेच रोहा-नागोठणे आणि रोहा- वरवटणे पूल वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे. पाली-वाकण पुलावरुन पाणी वाहत असल्याने येथील वाहतूक बंद करण्यात आली होती. कर्जतमध्येदेखील पावसाचा प्रकोप पहायला मिळत आहे. या ठिकाणीच्या दहीवली पुलावर पाणी आल्याने तोदेखील वाहतुकीसाठी बंद केला होता. शेलू बांधीवली नदीची पाणी पातळी वाढल्याने 1275 नागरिकांचे स्थलांतर पॅराडाईज इमारतीच्या टेरेसवर केले आहे, तसेच अन्य 35 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. अलिबाग-बोरघर येथील एक व्यक्ती वाहून गेला असून, त्यांचा मृतदेह सापडला आहे. कमलाकर धर्मा म्हात्रे असे त्याचे नाव आहे.
अलिबाग, पेण, मुरुड, पनवेल, कर्जत, खालापूर, पाली, रोहा, तळा, माणगाव, महाड, पोलादपूर, म्हसळा आणि श्रीवर्धन तालुक्यात अशंतः पूर्णतः पक्क्या आणि कच्च्या घरांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये एकूण 54 घरांचा समावेश आहे. तसेच चार चारचाकी वाहनांसह नऊ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु केली आहे.