बोट ॲम्ब्युलन्ससह नवजात शिशूसांठी विशेष रुग्णवाहिका
| रायगड | प्रतिनिधी |
राज्यातील नागरिकांसाठी 108 रुग्णवाहिका जीवनदायिनी ठरली आहे. ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट, बेसिक लाईफ सपोर्ट व बाईक ॲम्ब्युलन्स या प्रकारात ही सेवा पुरवली जाते. या सेवेत नवजात बालकांसाठी विशेष रुग्णवाहिका व बोट ॲम्ब्युलन्सचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. सद्यस्थितीत 108 सेवेद्वारे 937 रुग्णवाहिका राज्याच्या विविध भागात कार्यरत आहेत. या पुढे 1756 रुग्णवाहिका राज्याच्या विविध भागात सेवा देणार आहेत.
गेल्या 10 वर्षात राज्यातील करोडो नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. अनेक नवजात बालकांचा जन्म देखील रुग्णवाहिकेत झाला आहे. त्यामुळे 108 रुग्णवाहिका सेवा राज्यातील नागरिकांसाठी वरदायिनी ठरली आहे. समुद्र, व नद्यांमध्ये बुडून मृत्युमुखी पडणाऱ्या नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता, नव्याने 36 बोट ॲम्ब्युलन्स विविध अपघाती समुद्र किनारे व नदी पात्रांमध्ये तैनात होणार आहे. त्याचबरोबर नवजात शिशूंसाठी 25 रुग्णवाहिका नव्याने येणार आहेत.
रुग्णवाहिकेची संख्या वाढल्याने 108 क्रमांकावर कॉल केल्यानंतर रुग्ण वाहिकेचा प्रतिसाद देण्याची वेळ कमी होणार आहे. विशेषबाब म्हणजे जलदगतीने ॲम्ब्युलन्स घटनास्थळी पोहोचणार आहे. दहा वर्षापुर्वी 108 रुग्णवाहिका सुरु करण्यासाठी निविदा काढण्यात आली होती. त्याचा सर्व भांडवली खर्च शासनाच्या वतीने करण्यात आला होता. नविन निविदेनुसार 51 टक्के भांडवली खर्च सेवा पुरवठा करणाऱ्या संस्थेला करावा लागणार आहे. त्यामुळे सदर निविदा 10 वर्षांसाठी काढण्यात आली आहे. 108 रुग्णवाहिकेसाठी सद्यस्थितीत प्रती महिना 33 कोटी रुपये शासनाला खर्च करावे लागत होते. रुग्णवाहिकेच्या वाढत्या संख्येमुळे प्रती महिना 63 कोटी रुपये शासनाला खर्च करावे लागणार आहे. एकंदरीतच अतिरिक्त 30 कोटी प्रतिमहिना शासनाला खर्च करावा लागणार आहे.
सद्यस्थितीत रुग्णवाहिकांची संख्या
ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट : 233
बेसिक लाईफ सपोर्ट : 704
बाईक ॲम्ब्युलन्स : 33
नव्याने वाढणाऱ्या रुग्णवाहिकांची संख्या
ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट : 22
बेसिक लाईफ सपोर्ट : 570
बाईक ॲम्ब्युलन्स : 163
नवजात शिशुंसाठी रुग्णवाहिका : 25
बोट ॲम्ब्युलन्स : 36