मुरुडमध्ये जेलिफिशचे प्रमाण घटले

कोलंबीचा सिझन गेला वाया
। मुरूड-जंजिरा । वार्ताहर ।
गेल्या 20 दिवसांपासून मुरूड तालुक्यातील समुद्रात मोठ्या प्रमाणात आलेल्या जेलिफिश या दाहक मासळीचे प्रमाण घटले असून कोलंबी मासळी मिळू लागल्याची माहिती एकदरा येथील हनुमान मच्छीमार सह सोसाटीचे चेअरमन पांडुरंग आगरकर यांनी दिली. या सिझनमध्ये टायनी, सोलट आदी प्रकारची किंमती कोलंबी मिळत असते; परंतु 20 ते 25 दिवसांत मोठा सिझन वाया गेल्याने नुकसान झाले आहे.
गेल्या 20 ते 25 दिवसात ऐन कोलंबीच्या सिझनमध्ये समुद्रात जेलिफिश ही दाहक मासळी आल्याने मच्छीमारी जवळपास ठप्प राहिली होती. अन्य मासळीपेक्षा जेली फिश अधिक मिळत असल्याने समस्या वाढली होती. अनेक छोटे मच्छिमार बेजार झाले होते. राजपुरी, एकदरा, नांदगाव, बोर्ली, कोर्लई समुद्र परिसरात जेलिफिशने उच्छाद मांडला होता. जेलिफिशमुळे मासळी आणि कोलंबीचे प्रमाण निम्यावर आले असून खूप नुकसान झाले आहे. जेलिफिशमुळे पापलेट, रावस, कुपा, बोंबील आदि मासळी दूर खोल समुद्रात पळून जाते. त्यामुळे समुद्रात मोठी मासळी मिळत नाही. सध्या समुद्रात खूप समस्या झेलून मच्छिमारांना मासेमारी करणे भाग पडत आहे. जेलिफिशचा उपद्रव सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडच्या समुद्रात झाला असल्याची माहिती पांडुरंग आगरकर यांनी दिली.

Exit mobile version