श्रीवर्धनमध्ये विद्यार्थी संख्या घटली; पाच शाळा बंद

। दिघी । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यातील अनेक कुटुंबं प्रतिवर्षी उदरनिर्वाहाच्या शोधात शहरी भागाकडे वळत आहेत. अशा स्थलांतरामुळे अनेक घरे बंद होऊन जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या कमी होत आहे. परिणामी, येथील शाळा बंद पडत आहेत. याशिवाय कमी शिक्षक, गुणवत्तापूर्ण व स्पर्धात्मक युगात शिक्षणाचा अभाव व इंग्रजी माध्यमातील शिक्षणाचा प्रभाव ही कारणेदेखील जिल्हा परिषदेच्या शाळांतील कमी विद्यार्थी संख्येला कारणीभूत ठरत आहेत.


सुरुवातीला शिक्षणावर विशेष भर देण्यात आला. या अंतर्गत गाव तिथे जिल्हा परिषदेच्या शाळा उघडण्यात आल्या. मात्र, आता ग्रामीण भागातील चित्र बदललं आहे. रोजगारासोबत शिक्षण सुविधा मिळावी या आशेने अनेक कुटुंबे शहराकडे गेल्याने शाळांमध्ये दिवसेंदिवस पटसंख्या कमी होत चालली आहे. विशेष म्हणजे, आवश्यक सेवा असलेल्या श्रीवर्धन शहर, बोर्लीपंचतन, भरडखोल, दिघी, कुडगाव अशा काही प्रमुख शाळांवर विशेष प्रभाव झालेला दिसून येत नाही. मात्र, दुर्गम भागातील अनेक शाळेच्या पटसंख्येवर विपरित परिणाम झालेला दिसून येत आहे.

या 11 शाळांमध्ये पाचपेक्षा कमी विद्यार्थी
करलास, हरवीत उर्दू, वेळास आगार, भावे उर्दू, मोहितेवाडी, कोलमांडला उर्दू, राणवली उर्दू, कार्ले मराठी, निगडी उर्दू, वावेपंचतन, दळवीवाडी या शाळांची स्थिती भविष्यात पटसंख्येमुळे चिंताजनक आहे.

पाच शाळा झाल्या बंद
श्रीवर्धन तालुक्यातील बाग गडब, केळेचीवाडी, धनगरमलई, खारशेत भावे, कोंढेपंचतन या शाळा बंद झाल्या आहेत.

शाळांची दुरवस्था
बागमांडला उर्दू, सर्वे उर्दू, काळींजे मराठी, सायगाव मराठी, मणेरी, वडवली मराठी, खारशेत भावे उर्दू या शाळांची दुरुस्ती सुरू असून कारविणे कोंढ, मोहितेवाडी, जावेळ व वडघर कोंढ या शाळा निधी अभावी दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

शाळानुसार रिक्त पदे
तालुक्यातील 104 पैकी 5 शाळा बंद झाल्या आहेत. उर्वरित 99 शाळांसाठी 289 मंजूर शिक्षकांतील 81 शिक्षक पदे रिक्त असून, 10 केंद्रप्रमुखपदासाठी मंजुरी असताना, नऊ पदे रिक्त आहेत.

Exit mobile version