मथेरानमध्ये पर्यटकांचा शुकशुकाट

मंदीने मोडले व्यावसायिकांचे कंबरडे

। माथेरान । प्रतिनिधी ।

सध्या सुरू असलेल्या परीक्षांमुळे माथेरानमध्ये मंदीचे सावट असून गेल्या महिन्यापासून पर्यटकांची संख्या रोडवल्यामुळे व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते येथे वर्षभर मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. परंतु, मागील महिन्यापासून पर्यटकांची कमालीची घट झाल्याने व्यापारी वर्ग चिंतेत दिसत आहेत. त्याचा फटका येथे हॉटेल व्यवसायिक स्थानिक व्यावसायिक, लॉजधारक हातरिक्षा चालक अश्‍वचालक यांना बसला आहे.

एप्रिल मे महिन्यात पर्यटन हंगाम असतो त्यासाठी दुकानदारांनी आपल्या दुकानात कर्ज काढून माल भरून ठेवलेला आहे. त्यांची व्याजाची रक्कम निघणे अवघड झाले आहे. तर, हॉटेल मॅनेजमेंटमध्ये नोकरांचा पगार हॉटेलचा खर्च निघत नसल्याचे बोलले जात आहे. तसेच, माथेरानमध्ये वीज, पाणी व शासकीय दर खूपच जास्त आहेत. ते भरताना स्थानिकांची दमछाक होत आहे. हातावर पोट असलेले हात रिक्षाचालक व घोडेवाले यांना भाडे मिळत नसल्याने त्यांच्या भविष्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. काही व्यावसायिकांकडून पर्यटकांची होत असलेली दिशाभूल पाहता माथेरानचा पर्यटन व्यवसाय एक दिवसावर येऊन ठेपलेला आहे. सकाळी येऊन संध्याकाळी परत जाणार्‍या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्याने स्थानिक नागरिक आपला रोजगार गमावू लागला आहे. मुख्य बाजारपेठेत दिवसाही शुकशुकाट दिसत आहे. त्यामुळे पुढील सुट्ट्यांच्या हंगामात काय होणार, या चिंतेमध्ये स्थानिक दिसत आहेत.

माथेरानच्या पर्यटनासाठी ही धोक्याची घंटा असून शासकीय नियमांच्या जाचक अटींमुळे माथेरानचे पर्यटन धोक्यात आले आहे. वर्षांनुवर्षं माथेरान पर्यटन वाढीस असणारे प्रकल्प शासनाच्या अनास्तेमुळे झालेले नाहीत. येथील रस्ते, दळणवळण तसेच नगरपालिकेच्या माध्यमातून मनोरंजनासाठी काही सुविधा नसल्यामुळे पर्यटक दुसर्‍या स्थळाकडे कूच करताना दिसत आहेत. माथेरान परिसरात अत्याधुनिक सुसज्ज पार्क उभे राहत आहेत. पण, माथेरान स्थळ आजही दुर्गम म्हणून ओळखले जाते. दळणवळणाची खर्चिक बाब असल्याने पर्यटक येथून जाताना अनेकदा वाईट अनुभव घेऊन जात आहेत.

Exit mobile version