तरुणांसह ज्येष्ठांचा सहभाग; सुदृढ जीवनशैलीकडे वाढता कल
| खारघर | प्रतिनिधी |
खारघर परिसरात टेकड्यांचे प्रमाण जास्त असल्याने सध्या ट्रेकर्सची संख्या वाढत चालली आहे. यामध्ये तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांचीदेखील मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिसून येत आहे.गेल्या काही दिवसापासून राज्यात थंडीने हजेरी लावली आहे; तर मागील दोन ते तीन दिवसांपासून येथील पारादेखील घसरला आहे. गुलाबी व बोचऱ्या थंडीमुळे खारघरमधील उद्यान आणि मोकळ्या जागेत पहाटे व सायंकाळी चालण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढली आहे; तर तरुण-तरुणींचे ट्रेकिंगमध्ये सहभागी होण्याचे प्रमाण वाढले आहे. थंडगार हवा असे आरोग्याच्या दृष्टीने पोषक वातावरण असल्यामुळे खारघर आणि ओवे डोंगरावर ट्रेकिंग करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
सकाळच्या वेळी तरुण, तरुणींसह ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सकाळच्या वेळी डोंगरावर चढताना पक्षांची किलबिल, दऱ्या डोंगरावरील नागमोडी रस्त्यावरून ट्रेकिंग करताना मन प्रसन्न होते. ट्रेकिंगमध्ये वाकणे, ताणणे आणि अडथळ्यांवर पाऊल टाकणे यासह विविध हालचालींचा समावेश असतो. त्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारते. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून ट्रेकिंग करणाऱ्यांची संख्या वाढली असल्याचे प्रवीण पाटील स्पोर्ट असोसिएशनचे प्रशिक्षक आणि माजी नगरसेवक प्रवीण पाटील यांनी सांगितले. तर यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचादेखील सहभाग वाढला असल्याचे प्रवीण पाटील यांनी सांगितले.







