अटल सेतूवरील वाहनांची संख्या रोडावली

। मुंबई । प्रतिनिधी ।

अटल सेतूचे लोकार्पण होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र, या मार्गावरील वाहनांची संख्या रोडावली आहे. अटल सेतूवर दिवसाला 40 हजार गाड्या धावतील अशी अपेक्षा सरकारने केली होती. परंतु, या मार्गावर दिवसाला 22 हजार 689 वाहने धावत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 13 जानेवारी 2024 रोजी अटल सेतू या मार्गाचे लोकार्पण झाले होते. 22 किमी लांब असलेल्या या सागरी सेतूनवरून दिवसाला 40 हजार गाड्या धावतील अशी सरकारची अपेक्षा होती. यावर एमएमआरडीए आणि जपान इंटरनॅशनल एजन्सीने एक अभ्यास केला आहे. एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार मुंबई आणि नवी मुंबईला जोडण्यार्‍या या सेतूवरून गेल्या वर्षभरात 83 लाख गाड्या गेल्या आहेत. या सेतूवर सर्वाधिक गाड्या 14 जानेवारी 2024 रोजी गेल्या होत्या. नुकतेच या सेतूचे लोकार्पण झाले असल्याने त्या दिवशी 61 हजार 807 गाड्या या सेतूवरून गेल्या होत्या. या मार्गावर आकारला जाणारा अव्वाच्या सव्वा टोलमुळे वाहन चालकांनी या मार्गावर पाठ फिरवल्याचे सांगितले जात आहे.

अटल सेतूवर एका बाजूने प्रवास करण्यासाठी 200 ते 250 रुपये टोल आकारला जातो. तर, परतीच्या प्रवासासाठी 300 रुपये टोल भरावा लागतो. दिवसाचा पास 500 रुपये तर महिन्याचा पास हा 10 हजार रुपये इतका आहे. त्यामुळे, मुंबई आणि नवी मुंबईवर असलेल्या वाशी टोलनाक्यावरू चालक प्रवास करत आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने काही टोल नाके बंद केले होते. त्यात वाशी टोलनाक्याचाही समावेश होता. त्यामुळे, अटल सेतूवरून टोल देण्यापेक्षा वाशी टोल नाक्यावरील मार्ग वाहनचालक निवडत आहेत.

Exit mobile version