रानमेवा, वनसंपत्ती धोक्यात
। पाताळगंगा । प्रतिनिधी ।
रणरणत्या उन्हामध्ये वणवा लावण्यामध्ये प्रचंड वाढ होत असल्यामुळे रस्त्याच्या कडेला, माळरान आणि डोंगर भागांमध्ये वणवे मोठ्या प्रमाणात लावले जात आहेत. निसर्गातील असलेली वनसंपत्ती यामध्ये जळून खाक होत असल्याचे दुर्देवी चित्र सध्या तालुक्याच्या ठिकाणी पाहण्यास मिळत आहे. यातच एप्रिल महीन्यात जंगलातील रानमेवा तयार होत असतो. या रानमेव्यावरती आदिवासी बांधवांचे उपजिविकेचे साधन निर्माण होत असते. वणव्यांमुळे या व्यवसायाला खिळ बसत आहे. यामुळे सर्व काही संपुष्टात येत असल्याने पर्यावरणप्रेमी समवेत आदिवासींमध्ये नाराजीचा सूर निघत आहे.
त्याच बरोबर मुक्त विहार करणार्या प्राणीमात्रांवर संकटाला सामोरे जाण्याची वेळ निर्माण झाली आहे. वणवा लागल्याने जंगलातील गवत जळून खाक होत आहे. पेरणीपुर्व राब जाळण्यासाठी लागणारे गवत मिळत नसल्याने शेतकर्यांमध्ये नैराश्यता दिसून येत आहे. तसेच, जनावरांवर उपासमारीची वेळ येत असल्याची खंत शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहे.