जातनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी ओबीसी समाज एकवटला

रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

I अलिबाग I विशेष प्रतिनिधी I

जातनिहाय जनगणना करून ओबीसी समाजाला त्याचा न्याय हक्क मिळावेत या प्रमुख मागणीसाठी ओबीसी समन्वय संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली समाजाच्या मागण्यांसंदर्भात आवाज उठविण्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.  या मोर्चाचे नेतृत्व ओबीसी समन्वय संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी केले. 

राज्यात व देशात ओबीसी समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय मिळत नाही. कारण समाजाची ताकद वेगवेगळ्या जातीत विभागली गेली आहे. आपण एकत्रित नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे सर्व ओबीसी समाजाने एकत्रित येणे गरजेचे आहे. आपण एकत्रित न आल्यास समाजाला असलेले २७ टक्के असणारे आरक्षणही टिकणार नाही. त्यामुळे जातानिहाय जनगणना झाली पाहिजे व त्याप्रमाणात समाजाला विकासनिधी मिळाला पाहिजे, असे प्रतिपादन ओबीसी समन्वय संघर्ष समिती अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी केले.

खासदार सुनील तटकरे यांनी मार्गदर्शन करताना, संसदेच्या आगामी अधिवेशनात ओबीसी जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. ओबीसी आरक्षणावरील‌ निर्णय न झाल्याने नगरपालिकांच्या निवडणूका पुढे गेल्या आहेत. आजचा मोर्चा ही सुरुवात असून, आपल्या बाजूने निर्णय झाल्याशिवाय पाठी हटायचे नाही. ओबीसी समाजाने ही एकजूट कायम ठेवावी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ओबीसी समाजाच्या भूमिकेला पाठिंबा अशी ग्वाही खासदार सुनील तटकरे यांनी दिली

ओबीसी समाजाचे जास्तीत जास्त नेते लोकसभा, विधानसभेत जात नाहीत तोपर्यंत न्याय मिळणार नाही. आपल्या समाजात एकी नाही त्याचा फायदा इतर घेतात. शेतकरी कामगार पक्षाने सातत्याने ओबीसी समाजाच्या प्रश्नांना तसेच मागण्यांना पाठिंबा दिला आहे, असे माजी आमदार पंडित पाटील यांनी सांगितले.

या मोर्चात माजी पालकमंत्री आमदार आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार धैर्यशील पाटील, अलिबाग नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शिवसेना उद्भव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड आस्वाद पाटील, ओबीसी समन्वय संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर, उपाध्यक्ष जे. डी. तांडेल, जिल्हा अध्यक्ष सुरेश मगर, मधुकर पाटील, यांच्यासह सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते.

Exit mobile version