वैष्णवी हॉटेलजवळील उंचवटा नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी तोडला
| उरण | प्रतिनिधी |
गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून नागरिकांच्या त्रासाचे कारण ठरलेला पेन्शनर पार्क येथील वैष्णवी हॉटेललगत नाल्यावरील उंचवटा अखेर हटविण्यात आला. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून उंचवटा तोडण्याच्या कामाला सुरुवात केली. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
वैष्णवी हॉटेललगत नाल्यावर करण्यात आलेल्या या उंचवट्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत होता. या ठिकाणी वाहनांची कोंडी होण्याबरोबरच अनेक छोटे-मोठे अपघातही घडल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. त्यामुळे हा उंचवटा हटविण्याची मागणी करण्यात येत होती. या मार्गावर शाळा, महाविद्यालय, न्यायालय आणि ग्रामीण रुग्णालय असल्याने विद्यार्थी, पालक, रुग्ण, वकील तसेच नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्याचबरोबर केगाव, दांडा आणि मोरा परिसरातील नागरिकांसाठीही हा महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ या परिसरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती.
