जलजीवन मिशनमध्ये सावळागोंधळ

जुन्याच नळपाणी योजनेला रंगरंगोटी

। नेरळ । वार्ताहर ।

कर्जत तालुक्यात तब्बल 121 नळपाणी योजना जलजीवन मिशनमध्ये राबविण्यात येत आहेत. या नळपाणी योजनांपैकी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने राबविलेल्या सुगवे आणि सहा गावांच्या नळपाणी योजनेच्या यशस्वीतेचा प्रश्‍न निर्माण झाला होता. मात्र, आता जलजीवन मिशनमधून तीन नळपाणी योजना राबविण्यात येत आहे. दरम्यान, त्यातील अंजप बोरिवली या पाच कोटी खर्चाच्या नवीन नळपाणी योजनेसाठी जुन्या नळपाणी योजनेचे जलकुंभ आणि जलशुद्धीकरण केंद्राची इमारत वापरण्यात आली आहे. त्यामुळे जलजीवन मिशनमध्ये नक्की काय चाललंय? असे प्रश्‍न पडू लागले आहेत.

कर्जत तालुक्यातील सुगवेसह सहा गावे व सात आदिवासी वाड्या यांची नळपाणी योजना महाराष्ट्र राज्यात युती सरकार सत्तेवर असताना मंजूर झाली होती. त्यावेळी 2 कोटी 35 लाख रुपये खर्चाची नळपाणी योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून राबविण्यात आली. मात्र, 20 वर्षात या नळपाणी योजनेचे पाणी या भागांमध्ये पोहचले नव्हते. त्यात सतत नळपाणी योजना बंद असायची आणि त्यामुळे अखेर जलजीवन मिशनमधून बोरिवली ग्रामपंचायत हद्दीमधील गावांसाठी आता तीन वेगवेगळ्या नळपाणी योजना मंजूर झाल्या. 2021 मध्ये मंजूर झालेल्या त्या तिन्ही नळपाणी योजनांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. जलजीवन मिशनमधून अंजप बोरिवली या नळपाणी योजनेसाठी 5 कोटी, गुडवण नळपाणी योजनेसाठी 1 कोटी 33 लाख तर सुगवे नळपाणी योजनेसाठी 1 कोटी 71 लाख अशा तब्ब्ल आठ कोटी खर्चाची निधी जलजीवन मिशन मधून मंजूर झाले होते.

या जलजीवन मिशनमधून राबविण्यात येत असलेल्या अंजप बोरिवली नळपाणी योजनेचे काम केले जात असताना त्या ठिकाणी नेरळ कशेळे राज्यमार्ग रस्त्यावर असलेले जलकुंभ आणि जलशुद्धीकरण केंद्र हे नवीन नळपाणी योजनेच्या सेवेत रुजू केले. महाराष्ट्र्र जीवन प्राधिकरणाकडून राबविण्यात आलेल्या नळपाणी योजनेसाठी जलकुंभ बांधले होते, त्या योजनेसाठी जलशुधीकरण केंद्र उभारले होते. मात्र, जलजीवन मिशनमधून त्याच जुन्या जलकुंभाला तसेच त्याच ठिकाणी असलेले जलशुद्धीकरण केंद्र यांना जलजीवन मिशनसाठी रंगरंगोटी करून नवीन योजनेचे भाग असल्याचे दाखवण्यात आले आहे. हा काय प्रकार आहे, असा प्रश्‍न अंजप बोरिवली नळपाणी योजना राबविणार्‍या जलजीवन मिशनकडून केला जात आहे. या प्रकारची चौकशी रायगड जिल्हा प्रशासनाने करायला हवी, अशी मागणी होत आहे.

Exit mobile version