जुन्या खोपटा पुलाला भगदाड

| उरण | वार्ताहर |

सततच्या अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे जुन्या खोपटा पुलाला भगदाड पडल्याची घटना शुक्रवारी (दि.4) रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच गांभीर्य ओळखून सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता नरेश पवार यांनी तातडीने खोपटा पुलाची पाहणी करून पुलावरील भलामोठा खडा भरण्याचे काम हाती घेतले आहे.

उरण पूर्व विभागाला उरण शहरांशी जोडणाऱ्या खोपटा पुलाची उभारणी ही राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री बॅ.ए.आर.अंतुले यांनी केली होती. त्या खोपटा (जुन्या) पुलावरून प्रवासी वाहनांबरोबर 20 ते 30 टन क्षमतेच्या वाहनांची वर्दळ होऊ शकते, असे आवाहन उरण तहसील व सार्वजनिक बांधकाम विभाग उरणकडून सातत्याने करण्यात आले आहे. परंतु, या पुलावरून मोठ्या प्रमाणात 60 ते 80 टन क्षमतेच्या अवजड वाहनांची वाहतूक सर्रासपणे सुरू असते. याकडे उरण तहसील, उरण पोलीस ठाणे, उरण वाहतूक पोलीस आणि आरटीओचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. अवजड वाहनांच्या वर्दळीमुळेच पुलाला भगदाड पडल्याची घटना घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

प्रवासी नागरिकांच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली आहे. या घटनेची माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग उरणचे उपअभियंता नरेश पवार यांना मिळताच त्यांनी खोपटा पुलाची पाहणी करून सदर भला मोठा खड्डा भरण्याचे काम हाती घेतले आहे.

Exit mobile version