आयोजक असे रोखणार बैलगाडी शर्यतीतील अपघात

। पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुप्रीम कोर्टाने मागील 8 वर्षापासून असलेली बैलगाडी शर्यतीवरील बंदी हटवल्यानंतर सबंध महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यत प्रेमी आनंदून गेले आहेत. बैलगाडा मालक यांच्या आनंदाला देखील पारावार उरला नाही. मात्र आता बैलगाडी शर्यतीत होणारे अपघात हा चिंतेचा विषय बनला आहे. तर यावर रायगड जिल्ह्यातील अनेक आयोजकांनी उपाय देखील शोधून काढला आहे. शर्यतीच्या मैदानात दोन्ही बाजूला तारेची जाळी व बांबूचे कम्पाउंड तयार करून स्पर्धा सुरक्षितपणे राबविण्यावर आयोजक भर देत आहेत.

रायगड जिल्ह्यात बैलगाडी शर्यतीत घडलेल्या दोन अपघातात झाले होते. त्यामुळे आता जिल्हा प्रशासन देखील बैलगाडी शर्यतीच्या आयोजनाकडे पूर्णपणे लक्ष ठेवत असून शर्यतीच्या आयोजनात नियमावली पाळली जातेय का याकडे गांभीर्यपूर्वक पाहिले जाते आहे, शिवाय उधळलेले बैल प्रेक्षकांमध्ये शिरकाव करणार नाहीत, अथवा अतिउत्साही प्रेक्षक स्पर्धेवेळी मैदानात येणार नाहीत याकडे आयोजकांनी विशेष लक्ष दिले आहे. त्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने बैलगाडी शर्यतिचे मैदानाच्या दोन्ही बाजूला तारेच्या जाळ्या व सुरक्षित कम्पाउंड केले जात आहे व बैलगाडीप्रेमी, प्रेक्षक यांना दुरून या स्पर्धेची मजा घेण्याचे आवाहन केले जात आहे.

तसेच रुग्नवाहिका व पशुवैद्यकीय अधिकारी देखील उपस्थित राहत आहेत. यावेळी पोलीस बंदोबस्त देखील ठेवला जात आहे, या उपाय योजनांमुळे आता शर्यतीदरम्यान कोणताही अपघात घडत नाही असे समोर आले आहे. बैलगाडी शर्यतीतील अपघात हा रोखणारा नवा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचे लक्ष वेधून घेत आहे. महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत सुरक्षेच्या या पद्धतीने पार पडल्यास अपघाताला आळा बसणार असल्याचे मत ज्येष्ठ जाणकार व तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

Exit mobile version