डिस्को युगाचा उद्गाता

अनेक  गायक-गायिकांच्या गळ्यांतही रुजतील अशी गाणी देणारा आणि न डान्सरनाही बिनधास्तपणे  नाचायची सोय करणारा एक वेगळ्या धाटणीचा संगीतकार बप्पी लहिरी यांचे निधन झाले आहे. त्यांच्यामुळे भारतात डिस्को संगीत नृत्याचा जमाना रुजला आणि आज पन्नाशीत आणि साठीत असलेल्या तेव्हाच्या कॉलेजकुमार, कॉलेजकुमारिकांना पारंपारिक संगीतापेक्षा वेगळी आविष्काराची परिभाषा मिळाली. त्यांना संगीत देण्यासाठी मिळालेले सिनेमे हे ‘नमक हलाल’, ‘घायल’ आदी दोन चार अपवाद वगळले तर कधीही सर्वांत मोठे किंवा प्रतिष्ठित नव्हते. मात्र त्यांनी आपली पारंपरिक मेलडीच्या संगीतासह तेव्हाच्या नवीन युगाच्या डिस्को संगीताचा वापर करून आपली गाणी संस्मरणीय बनवली. आजही बप्पी लहिरी म्हटल्यावर त्यांचा भारी गॉगल लावलेला चेहरा आणि गळ्यात अनेक सोन्याच्या साखळ्यांनी भरलेल्या छातीची त्यांची मूर्ती डोळ्यांपुढे उभी राहते. तसेच, ‘बाँबे से आया मेरा दोस्त, दोस्त को सलाम करो’ हे प्रत्येकाच्या ओठांवर रुळलेले आणि कोणीही गाऊ शकणारे गाणे आठवते. त्यांनी ‘चलते चलते’ या चित्रपटात किशोर कुमार यांच्याकडून गाऊन घेतलेले ‘चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना’ हे गाणेही आज चार दशकांहून अधिक काळ उलटल्यानंतरही तितकेच आठवते. ते आजही कॉलेजच्या शेवटच्या दिवशी होणार्‍या फेअरवेल पार्टीत गायचे किंवा निरोप समारंभात गायचे गाणे ठरलेलेे आहे. ‘साहेब’ चित्रपटातील ‘यार बिना चैन कहा रे, प्यार बिना चैन कहा रे’ हे गाणे तर सदाबहार गाण्यात मोजले जाते. या गाण्यासाठी त्यांनी आपला आवाजही दिला. त्यांनी अनेक गाणी गायली. स्वत: संगीतबद्ध केलेली किंवा अन्य संगीतकारांसाठी सुद्धा. त्यांची अलिकडची अशी गाजलेली गाणी म्हणजे ‘टॅक्सी नंबर 9211’ मधील ‘ये है बंबई नगरिया’ हे गाणे आणि त्याहून सुपरहिट ठरलेले ‘द डर्टी पिक्चर’ मधील ‘उ ला ला उ ला ला’ हे गाणे. मात्र त्यांची जशी पारंपरिक गाण्यांतून ओळख झाली तशी त्यांचे वेगळेपण ठरवणारी ओळख डिस्को प्रकारच्या संगीतातून झाली. त्यांनी तसे काही डिस्को संगीतावर आधारीत सुपरहिट सिनेमे दिले. एका अर्थाने त्यांना भारतातील डिस्को संगीत युगाचा उद्गाता असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ऐंशीच्या दशकात संगीत प्रकारात बदल घडत होते आणि ते चित्रपट क्षेत्रात आले नसते तरच नवल. डिस्को संगीत हा नवीन संगीताचा आणि नृत्याचाही प्रकार नव्या तरुणाईच्या मनाचा ठाव घेऊ लागला होता. चित्रपट क्षेत्रातही बदल घडत होते. ज्याप्रमाणे पारंपारिक मारामारी नेहमीची होऊन ब्रुस ली प्रणित कुंग फू प्रकारच्या फायटिंगमध्ये तरुणाईला रस निर्माण झाला होता. मिथुन चक्रवर्ती हा नवा नायक याच प्रकारात पारंगत होऊन, ब्लॅक बेल्ट धारक बनून पडद्यावर अवतरला होता. त्याने आपली एक नवीन नृत्यशैलीही आणली होती. ती होती डिस्कोची. त्यासाठी मिथुनचा आवाज आणि त्याच्या नृत्याला आवश्यक संगीत देणार्‍या संगीतकाराची गरज बप्पी लहिरी यांनी पूर्ण केली. अनेक चित्रपटांत मिथुनचा आवाज बनून बप्पी गायले आणि त्याच्यासाठी संगीतही दिले. त्यातून ‘डिस्को डान्सर’ सारखे त्या काळचे सर्वाधिक हिट चित्रपट निर्माण झाले. ‘आय एम अ डिस्को डान्सर’ सारखे गाणे त्यांनी रचले आणि ‘मौसम है गाने का’ सारखी गाणी त्यांनी गायली. तो काळ त्यांनी आपल्या संगीताने रंगवला आणि त्यात यश मिळवून दिले. तरुणाई ज्या नवीन प्रकारच्या संगीताच्या शोधात होती, ते त्यांनी पुरवले. त्या अर्थी ते ऐंशी आणि नव्वदच्या दशकातील काळावर राज्य करीत होते. त्यांनी हिंदी बरोबरच बंगाली, तेलुगु या चित्रपटाही मोठ्या प्रमाणात संगीत दिले. शिवाय तमिळ, कन्नड, गुजराती चित्रपटांनाही दिले. परंतु त्यांची ओळख प्रामुख्याने हिंदी आणि बंगाली चित्रपटांतील संगीतामुळे झाली. त्यांनी मधुर सुरावटीच्या गाण्यांची भेट जशी दिली तशी त्यांनी ब्रेक डान्स आदी नव्या नृत्यप्रकारांसाठीही उडत्या आणि पाश्‍चात्य बीटच्या संगीतातूनही लोकांचे रंजन केले. कभी अलविदा ना कहना असे म्हणणार्‍या या अनोख्या कलाकाराने आपला निरोप घेतला आहे. मात्र त्याचा संगीत खजिना सर्व रसिकांसाठी मागे ठेवला आहे. बप्पी लहिरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.  

Exit mobile version