उमटे धरणाच्या मालकांनी तोंड लपवले

महसुल यंत्रणा आली धावून, कृषीवलच्या वृत्ताची घेतली दखल

| रायगड | खास प्रतिनिधी |

उमटे धरणाच्या ओव्हरफ्लोची भिंत अतिशय धोकादायक झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात ती फुटून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याचे वृत्त दैनिक कृषीवलने शनिवारी (दि.15) जुनच्या अंकात उमटे धरण फुटीचा धोका या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द केले होते. महसुल विभागाने याची तातडीने दखल घेतली. मंगळवारी धरणाच्या भिंतीची पाहणी करण्यासाठी अलिबाग तहसलिदार विक्रम पाटील यांनी तलाठी, मंडळ अधिकारी यांना पाठवले. परंतु, ज्यांच्या मालकीचे हे धरण आहे, ती रायगड जिल्हा परिषद मात्र, कोठे तोंड लपवून बसली आहे, असा सवाल त्या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

कोकणात दर वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. या कालावधीत दरडीपडणे, महापूर, इमारतींची पडझड यासह अन्य प्रकारची आपत्ती येत असते. अलिबाग तालुक्यात 1978 साली उमटे धरणाची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या धरणाच्या ओव्हरफ्लोच्या भिंतीची दुरावस्था झाली आहे. भिंतीची चार-पाच ठिकाणी पडझड झाली असून एका ठिकाणी भलेमोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे पावसाळ्यात या भिंतीला धोका पोहचण्याची अधिक शक्यता आहे. धरण परिसरामध्ये 47 गावे आणि 33 आदिवासी वाड्या असून सुमारे तीन लाख लोकसंख्या आहे.

2017-2019 सालापासून धरणाच्या संरक्षक भिंतीच्या दुरवस्थेबाबत जिल्हा परिषदेकडे तक्रार करण्यात येत आहे. मात्र, त्यांच्याकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. शेकापच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी उमटे धरणाच्या प्रश्‍नी सातत्याने आवाज उठवला आहे. त्या नेहमीच येथील नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहील्या आहेत. त्यांच्याच पुढाकारातून धरणाचा गाळ काढण्यात आला हे विसरता येणार नाही. दैनिक कृषीवलने धरणाची सध्यस्थिती उघड केली. त्यामध्ये धरणाचे भयान वास्तव समोर आले आहे. धरणाची भिंत फुटली, तर फार मोठे संकट धरण परिसरातील नागरिकांवर येऊ शकते. कृषीवलने दिलेल्या वृत्ताची दखल अलिबाग तहसिलदार विक्रम पाटील यांनी घेतली. त्यांनी मंगळवारी तातडीने मंडळ अधिकारी राम मांढरे, रामराज तलाठी प्रदीप थोरात, बोरघर तलाठी सर्फराज सुभेदार, कोतवाल मोहन लोभी यांना पंचनामा करण्यासाठी धाडले होते. महसुल यंत्रणेने पंचनामा केला असून धरणाच्या भिंतीला चार-पाच ठिकाणी भगदाड पडले आहे. त्यामुळे धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मंडळ अधिकारी राम मांढरे यांनी कृषीवलशी बोलताना सांगितले. याबाबतचा अहवाल अलिबाग तहसिलदार पाटील यांना देण्यात येणार असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांचे खरोखरच आभार, त्यांनी परिस्थितीचे गांभिर्य पाहून आपल्या अधिकर्‍यांना प्रत्यक्ष धरणावर जाऊन धरणाची पाहाणी करण्याचे आदेश दिले. परंतु ज्यांच्या अधिकार क्षेत्रात उमटे धरण आहे ते अजगराच्या झोपेचे सोंग घेतलेले ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी अजूनपर्यंत पोहचलेले नाहीत, हा निर्लज्ज पणाचा कळस आहे. त्यांची खाते निहाय चौकशी करुन त्यांचे निलंबन करावे, अशी मागणीही अ‍ॅड. पाटील यांनी केली.

महसुल यंत्रणेने धरणाबाबत तातडीने दखल घेतली मात्र, रायगड जिल्हा परिषदेच्या मालकीचे हे धरण आहे. तेथील प्रशासनातील एकही अधिकारी अथवा कर्मचारी फिरकलाच नाही. त्यामुळे स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली. जिल्हा परिषदेला आमच्या जगण्या-मरणाबाबत काही देणे-घेणे नाही, असेच दिसून येते. त्यांना आमची फिकीर असती, तर आतापर्यंत केलेल्या तक्रारींची दखल घेऊन धरणाची डागडुजी केली असती, असे उमटे धरण संर्घष ग्रुपचे अ‍ॅड. राकेश पाटील यांनी कृषीवलला सांगितले.

उमटे धरणातील गाळ काढणे, सांडव्याची दुरुस्ती करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत ऑनलाईन बैठक नुकतीच पार पडली आहे. त्या बैठकीला खासदार, आमदार यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते. तातडीने अंदाजपत्रक तयार करण्याच्या सुचना अजित पवार यांनी लघुपाटबंधारे विभागाला दिल्या आहेत. धरणाची मालकी आमच्याकडे नाही, पाटबंधारे विभागाकडे आहे. आम्हाला धरणाचे पाणी वापरायला दिले आहे.

डॉ. भरत बास्टेवाड,
मुख्यकार्यकारी अधिकारी
Exit mobile version