आदिवासींच्या स्थलांतरामुळे वाड्या ओस; वेठबिगारी, रोजगारासाठी स्थलांतर

। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।

पाली सुधागडसह रायगड जिल्ह्यात आदिवासी स्थलांतरणाचा वेग वाढला असून, त्यामुळे आदिवासी वाड्या ओस पडू लागल्या आहेत. वेठबिगारी, रोजगारासाठी स्थलांतराचे प्रमाण वाढल्याचे चित्र दिसून येतेय. आदिवासींना ठेकेदारापर्यंत पोहोचविणार्‍या दलालांचा सुळसुळाट वाढला आहे. तर, ठेकेदाराकडून या कुटुंबाच्या सुरक्षा देखभालीची कोणतीही काळजी घेत नसल्याने अनेकांचा दुर्दैवी मृत्यू होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

स्थलांतर रोखण्यासाठी व त्यावरील उपाययोजना राबविण्याच्या अनुषंगाने पाली पोलीस ठाण्यात तहसीलदार दिलीप रायन्नावार व पोलीस निरीक्षक विश्‍वजित काईनगडे, पोलीस उपनिरीक्षक श्री. पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आदिवासी समाजाचे युवा कार्यकर्ते रवी पवार व रमेश पवार, तसेच आदिवासी बांधव यांच्यासमवेत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीत आदिवासी स्थलांतर रोखण्यासाठी प्रबोधन, जनजागृती व प्रशासनाचा धाक निर्माण करण्यावर चर्चा झाली. यावेळी सामाजिक प्रश्‍नावर काम करणारे आदिवासी बांधवांनी प्रशासनाला अनेक गोष्टी निदर्शनास आणून दिल्या. मागील वर्षी कोरोना आणि लॉकडाऊन मुळे आदिवासी स्थलांतर फारसे झाले नव्हते. मात्र, यंदा तुळशीची लग्ने आटोपली आणि आदिवासी बांधवांची पोटापाण्यासाठी इतर राज्यात आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतर सुरू झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आदिवासी वाडे-पाड्या आणि वस्त्या ओस पडू लागल्या आहेत.

यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांतील मुलेदेखील आपोआप कमी होऊन शाळादेखील ओस पडल्या आहेत. यामुळे खेडो-पाड्यातील बाजारपेठाही मंदावल्या आहेत. सद्यस्थितीत आदिवासी बांधवांना रोजगाराच्या निमित्ताने परजिल्ह्यात नेले जाते, यामध्ये अनेकजण दगावतात, तसेच स्थलांतर झालेल्या कुटुंबातील लहान मुले व वृद्ध आईवडील यांचेही हाल होतात, ठेकेदार या लहान मुलांना घरकामासाठी ठेवतात, त्यामुळे त्यांचे शिक्षण बुडते, तसेच या मुलांमध्ये कुपोषणाचे प्रकार वाढतात, महिलांवर अत्याचार वाढतात, त्यामुळे स्थलांतर रोखण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत, असे आदिवासी समाजातील सुशिक्षित कार्यकर्ते रवी पवार यांनी सांगितले.

आदिवासी समाजातील लोकांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होत नाही. त्यामुळे पोटापाण्यासाठी बायका-पोरांसह स्थलांतर करावे लागते. शासन स्तरावर हे स्थलांतर थांबावे यासाठी अधिक प्रयत्न होणे गरजेचे आहे.

रमेश पवार, कोकण संघटक, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद

जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या सप्तसूत्रीची अंमलबजावणी प्रभावीपणे करणार आहोत. विविध योजनांची माहिती आदिवासींपर्यंत पोहोचवत आहोत. आदिवासींचे बालविवाह थांबणे आवश्यक आहे. स्थलांतर रोखण्यासाठी पथनाट्याद्वारे प्रबोधन व जनजागृती केली जात आहे.

शशिकला अहिरराव, प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास विभाग, पेण

स्थलांतर रोखण्यासाठी पथनाट्याद्वारे प्रबोधन व जनजागृती करण्याचा हा पथदर्शी प्रकल्प स्वयंस्फूर्तीने राबविला जातोय. शिवाय, संबंधित ठेकेदारांकडून हमीपत्र भरून घेतले जात आहेत. काही समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून रोजगार, शिक्षण व कौशल्य निर्मितीसाठी प्रयत्न होत आहेत.

दिलीप रायण्णावार, तहसीलदार, पाली-सुधागड
Exit mobile version